प्रतिनिधी / वास्को
मुरगावची पालिका निवडणुक होऊन दीड महिना उलटला आहे. पालिका मंडळाची स्थापना होऊन बारा दिवस उलटले आहेत. मात्र, पालिका मंडळ अद्यापही सुस्तच असल्याचे दिसत आहे. शहरात गलिच्छता माजत आहे. तौक्ते वादळात कोसळलेल्या वृक्षांचे अडथळे अद्यापही रस्त्यांवरच असून पालिका मंडळाने मरगळ झटकण्याची ईच्छा लोक बाळगून आहेत.
वास्को शहर व परीसरात गलिच्छता बोकाळू लागलेली आहे. आता पावसाचेही आगमन झाल्याने गलिच्छ वातावरणात भर पडू लागलेली आहे. मुरगाव बंदरातील माल वाहतुकीमुळे डांबरी रस्ता लाल होऊन धुळवडत असून शहरात प्रदुषण होत आहे. तौक्ते वादळात वास्को शहर व पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पडझड झाली. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले. अग्नीशामक दलाने हे वृक्ष कापून गैरसोय व आणि धोके दूर केले. मात्र, त्या वृक्षांचे ओंडके आणि पसारा अद्याप रस्त्यां रस्त्यांवरच असून तो उचलण्याच्या प्रतिक्षेत आहे. सडय़ावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पात जागें sअभावी कचरा टाकणे कठीण होऊ लागलेले आहे. वास्को शहरातील अंतर्गंत रस्त्यांचीही चाळण झालेली असून या दयनीय परिस्थितीचा लोकांनाही उबग आलेला आहे.
नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडण्या पालिकडे अस्तित्व नाही
मुरगाव पालिकेच्या निवडणुका 23 एप्रीलला पार पडल्या होत्या. कोविडच्या वातावरणात जीवाचा धोका पत्करून उमेदवारांनी या निवडणुका लढवल्या. कार्यकर्तेही विजयासाठी लढले. अनेकांना निवडणुकीनंतर कोरोनाचा सामना करावा लागला. त्यात काहींचा बळीही गेला. अद्यापही अनेक कार्यकर्ते कोरोनाने त्रस्त आहेत. पालिका मंडळ मात्र सुस्तच असल्याचे दिसत आहे. पालिका मंडळाची स्थापना होऊन बारा दिवस उलटले आहेत. मात्र, मंडळाने अद्याप हालचाल केलेली नाही. काही अपवाद वगळल्यास नगरसेवकांमध्ये उत्साह नाही. कामांसाठी उत्सुक नाहीत असेच चित्र दिसते. काही नगरसेवकांनी निवडून येताच कामाची धडपड दाखवली. तौक्ते वादळाच्या काळात झालेली पडझड दूर करण्यासाठी काही नगरसेवक पालिका आणि शासकीय खात्यांची वाट न पाहता कार्यकर्त्यांना घेऊन स्वता मैदानात उतरले होते. त्यांचे कौतुकही झाले. मात्र, पालिका मंडळाने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड करण्या पालिकडे अद्याप अस्तित्व दाखवलेले नाही.
गलिच्छता माजू लागलीय, समस्यांमध्ये पडतेय भर
सध्या वास्को शहरासह पालिका क्षेत्रात गलिच्छता डोके वर काढत आहे. पावसाळा सुरू झाल्याने समस्यांमध्ये भर पडू लागलेली आहे. मान्सूनपूर्व कामे काही दिवसांत कशीबशी उरकण्यात आलेली आहेत. झोकून काम करण्यासाठी पालिकेकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्याचे बोलले जात आहे. कंत्राटी मजूर पालिकेला प्रतिसाद देत नाहीत. आर्थिक अडचणींमुळे पालिकेसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. पालिका मंडळालाच यावर उतारा काढावा लागणार आहे. सडय़ावरील कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि तेथील परीसर ही गंभीर समस्या बनलेली आहे. तीथे कचरा टाकण्यासाठी सध्या जागा कमी पडत आहे. पालिका सफाई कामगारांना या समस्येला प्रत्यक्ष तोंड द्यावे लागत आहे. याचाच परीणाम म्हणून पालिका क्षेत्रात इतर ठिकाणी गलिच्छता माजू लागलेली आहे. वास्को शहरातील चिकन मटण मार्केट सध्या गलिच्छतेचे आगर बनलेले आहे. कचऱयाचा प्रचंड पसारा या ठिकाणी दिसत असून परीसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यातच लॉकडाऊन असूनही चिकन मटण खरेदीसाठी लोकांची दुर्गंधीतही झुंबड उडत आहे. पालिका मंडळाने आता गलिच्छता दूर करण्यासाठी झटायला हवे.
वादळात कोसळलेल्या वृक्षांचा पसारा रस्त्यांवरच
तौक्ते वादळात वास्को शहरासह पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पडझड झाली. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळून हानी झाली. रस्त्यांरस्त्यावर आणि घरांवर पडलेले वृक्ष अग्नीशामक दलाने कापून दूर केले. मात्र, वादळ होऊन पंधरा दिवस उलटले तरी या वृक्षांचे ओंडके व सारा पसारा अनेक ठिकाणी रस्त्यांच्याकडेला पडून आहे. हा पसारा उचलणे पालिकेला केव्हा शक्य होणार याची प्रतिक्षा लोकांना लागलेली आहे.
नगरसेवक जनसेवेच्या कामाला लागले आहेत- नगराध्यक्ष
दरम्यान, मुरगावचे नगराध्यक्ष दामू कासकर यांनी पालिका मंडळ कामाला लागल्याचे म्हटले आहे. सर्व नगरसेवक आपल्यापरीने कामे करीत असून ते लोकांना निराश करणार नाहीत. पालिका मंडळाची स्थापना नुकतीच झालेली आहे. आम्ही अनेक गोष्टींचे नियोजन करीत आहोत. वास्को शहरात नवीन मासळी मार्केट उभारण्यासाठी प्रथम देव दामोदर ट्रस्टच्या जागेत मासे विकेत्यांसाठी शेड उभारण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच या मार्केटच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल असे कासकर म्हणाले.