पंतप्रधान गती शक्ती योजनेअंतर्गंतच्या विविध प्रकल्पाची माहिती
प्रतिनिधी /वास्को
मुरगाव बंदरात येणाऱया काळात 842 कोटी खर्चून एमपीएतर्फे धक्क्याचा विकास करण्यात येणार असून या धक्क्यावर खनिज मालाची हाताळणी होणार आहे. तसेच याच प्रकल्पाअंतर्गंत तीन बार्ज जेटी उभारण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पंतप्रधान गती शक्ती विकास योजनेअंतर्गंत आणि पीपीपी तत्वावर उभारण्यात येणार असून तो पूर्णपणे यांत्रीक असणार आहे. वार्षीक 12 दशलक्ष मॅट्रीक टन खनिज हाताळणारा हा प्रकल्प गोव्यातील खनिज उद्योग, बार्ज उद्योग तसेच या उद्योगांशी संबंधीत इतर लघु उद्योगांनाही बळ देणारा ठरणार असल्याचे एमपीए(एमपीटी)चे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी म्हटले आहे.
मुरगाव बंदराने पंतप्रधान गती शक्ती योजनेअंतर्गंत पूर्ण केलेले विकास प्रकल्प, सध्या होऊ घातलेले विकास प्रकल्प आणि येणाऱया काळात प्रत्यक्षात येतील अशा नियोजित विकास प्रकल्पासंबंधी माहिती देण्यासाठी एमपीएतर्फे हेडलॅण्ड सडा येथील एमपीएच्या प्रशासकीय कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष राजीव जलोटा बोलत होते. त्यांनी आभासी माध्यमांव्दारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी एमपीएचे उपाध्यक्ष गुरूप्रसाद राय तसेच मुरगाव बंदराशीसंबंधीत विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अध्यक्ष व उपाध्यक्षांनी यावेळी पत्रकारांबरोबरच या प्रतिनिधींशीही संवाद साधला. उद्योग प्रतिनिधीनीही यावेळी काही प्रश्न उपस्थित केले. उपाध्यक्ष गुरूप्रसाद राय यांनी त्यांना समर्पक उत्तरे दिली. यावेळी अध्यक्ष राजीव जलोटा यांनी पंतप्रधान गती शक्ती विकास योजनेविषयी माहिती दिली. या योजनेच्या उध्दीष्ठांबाबतही त्यांनी माहिती दिली. रस्ता, रेल्वे, विमानतळ, बंदर, जलमार्ग, मल्टीमोडल व लॉजिस्टीक्स जी देशाच्या गतीशील विकासाची यंत्रे आहेत अशा साधनसुविधांच्या विकासासाठी सहकार्याच्या भावनेने सोळा मंत्रालये एकाच व्यासपिठावर एकत्र आलेली असून याव्दारे विकासाची गती वाढेल असे ते म्हणाले.
पंतप्रधान गती शक्ती अंतर्गंत प्रुझ टर्मिनल, पणजी व जुन्या गोव्यात तरंगते धक्के, रोपॅक्स व फेरीसेवेचेही नियोजन
या गती शक्ती योजनेअंतर्गंत मुरगाव बंदरात एमपीएतर्फे बांधण्यात आलेला अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय व देशी क्रूझ टर्मिनल व त्यात उपलब्ध केलेल्या विदेशी पर्यटकांसाठीच्या विविध सुविधांविषयी त्यांनी माहिती दिली. देशी पर्यटकांसाठीही उपलब्ध करण्यात येणाऱया विविध सोयीसुविधा विषयीही त्यांनी माहिती दिली. पर्यटकांना नजरेसमोर ठेवून व्यवसाय संकुल उपलब्ध केले जाईल त्यात खरेदी विक्रीचा बाजार असेल. त्यात स्थानिकांची कलात्मक आणि इतर उत्पादने असतील असे अध्यक्ष जलोटा म्हणाले. गोव्यातील समुद्री जाळय़ाचा लाभ घेत येथे दाखल होणाऱया पर्यटकांच्या आकर्षणासाठी आणि त्यांना आनंदी समुद्री सफरीचा लाभ घेता यावा यासाठी मुरगाव बंदरात प्रुझ टर्मिनल जवळच रोपॅक्स आणि फेरीसेवा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. शिवाय पर्यटन व्यवसायाच्या वृध्दीसाठी पणजी व जुने गोवे येथे बांधण्यात आलेल्या तरंगत्या धक्क्यावरही अध्यक्ष जलोटा यांनी प्रकाश टाकला.
मुरगाव बंदरात पीपीपी तत्वार उभारणार खनिज हाताळणीसाठी 842 कोटींचा यांत्रीक धक्का
सर्वात महत्वाचे म्हणजे मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक नऊचे यांत्रीकीकरण होणार असून हा अत्याधुनिक धक्का मुरगाव बंदरातून निर्यात होणाऱया खनिज मालाच्या हाताळणीसाठी वापरात येणार आहे. या ठिकाणी तीन बार्ज धक्के असणार आहेत. हा प्रकल्प एकूण 842 कोटींचा असून पीपीपी म्हणजेच खासगी कंपन्यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे खनिज निर्यात उद्योगाला बळ मिळणार आहे. वार्षिक 12 दशलक्ष मॅट्रीक टन खनिज या धक्क्यावर हाताळले जाणार आहे. गोव्यातील खनिज उद्योग, बार्ज उद्योग तसेच बंदराशी व खनिज उद्योगाशी संबंधीत इतर लघु उद्योगानांही या विकासाचा लाभ होईल व गोव्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असे राजीव जलोटा म्हणाले. वास्कोतील वरूणापुरी ते हेडलॅण्ड सडापर्यंतचा नुकताच वाहतुकीस खुला झालेला चौपदरी महामार्ग वास्कोत फार मोठा बदल घडवून आणणार आहे. वास्को शहरातील वाहतुकीचा गोंधळ या नव्या मार्गामुळे दूर होईल ते असे म्हणाले.