प्रतिनिधी / मुरगुड
मुरगूड ग्रामीण रुग्णालय 50 बेडचे होण्यासाठी आता प्रतिक्षा आहे. ती लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची. मुरगूडच्या या मागणीला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्यामुळे प्रत्यक्षात या मागणीच्या पूर्ततेसाठी आता ‘फॉलोअप’ची गरज आहे.
‘प्रत्येक तालुक्याला एक ग्रामीण रुग्णालय ‘ हा नियम असल्याने कागलनंतर मुरगूडात ग्रामीण रुग्णालय अशक्य होते. परिसरातील 40 ते 45 खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या गावच्या लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याच्या हेतूने दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संयुक्त प्रयत्नातून डिसेंबर 2005 मध्ये 30 खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली.
1891 साली बांधलेल्या संस्थानकालीन इमारतीत सुरू असणारा जिल्हापरिषदेचा दवाखाना वर्ग करून ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज सुरू झाले. 26 मार्च 2006 रोजी रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन झाले. 13 हजार चौरस फूट जागेत सव्वा दोन कोटी रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालयाची नूतन वास्तू सज्ज झाली. तीस खाटाची क्षमता असलेल्या या रुग्णालयात जनरल वार्ड, प्रसुती विभाग, क्ष-किरण विभाग, रक्ततपासणी, शस्त्रक्रिया यासह अन्य रुग्णसेवा आहेत. एक वैद्यकीय अधीक्षक, दोन वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्यासह मंजूर स्टाप कार्यरत आहे.
दररोज या रुग्णालयात अडीशेपर्यंत बाह्यरुग्ण तपासणी आणि आठवड्यातून 20 ते 25 बाळंतपण होतात. या रुग्णालयास रुग्णांच्या प्रतिसादाचा विचार करता 50 खाटाच्या रुग्णालयाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे औषधे, वैद्यकिय साहित्य व रुग्णांसाठी अन्य सुविधांमध्ये दुपटीने भर पडणार आहे. शिवाय एमडी मेडिसिन ( भिषक ), दोन आयुष, अस्थिरोगतज्ञ, दंतचिकित्सक तसेच अतिदक्षता, हृदयविकार, सीझर, सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे अशा सर्व सुविधा आणि जादाच्या आवश्यक स्टाफचीही भर पडणार आहे.
अडीच वर्ष पूर्वीच प्रस्ताव !
मुरगूड ग्रामीण रुग्णालय 50 खाटाचे होण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी 2018 साली प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सिव्हिल हॉस्पिटल, उपसंचालक कार्यालय आणि संचालक कार्यालय मुंबई असा या प्रस्तावाचा फेरा पूर्णही झाला आहे. विधानसभेत घोषणा होऊन त्याचे अध्यादेशात रूपांतर होणे बाकी आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी आवश्यक पाठपुरावा आणि रेटा लावल्यास 50 खाटांचे रुग्णालय शक्य आहे.
अतिदक्षता विभाग तरच सक्षम !
खासदार संजय मंडलिक यांनी ऑगस्टमध्ये एस. डी. एम. फौंडेशनच्यावतीने दिलेल्या जिल्हयातील दहा ग्रामीण रुग्णालये व दोन उपजिल्हा रुग्णालयांना अत्याधुनिक उपकरणे व सुसज्ज अतिदक्षता कक्ष लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयाचाही यात समावेश आहे. हे रुग्णालय 50 खाटाचे झाल्यास तज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊन दिलेला अतिदक्षता विभाग सक्षम होऊ शकणार आहे.