करवीर/प्रतिनिधी
पुणे–बंगलोर महामार्ग गोकुळ शिरगाव येथे महामार्गाच्या साईड पट्टीवर टाकलेल्या मुरमाच्या भराव्या वरून मोटरसायकल स्लिप होऊन दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमर सदाशिव कुरळुपे (वय-38, सध्या रा. गोकुळ शिरगाव, कागलेमाळ, मूळ रा. हेब्बाळ, ता. चिकोडी, जि.बेळगाव) असे या युवकाचे नाव आहे. आज, शनिवार दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत माहिती अशी की, अमर हे गोकुळ शिरगाव एमआयडिसीमधील इंडो काउंट सुतमिल मध्ये काम करत होते. त्यांना आज सुट्टी असल्याने ते दुपारी आपली घरची कामे आटोपून आपल्या मोटरसायकलवरून पुणे– बेंगलोर महामार्गावरून घरी येत होते. यावेळी नरसिंह सव्हिसिंग सेंटरच्या समोर सेवा रस्त्यावरून महामार्गावर येत असताना महामार्गाच्या शेजारीच साईड पाट्यांचा वर टाकलेल्या ठिसाळ मुरमामुळे त्यांची गाडी स्लीप झाल्याने ते महामार्गावर कोसळले. यावेळी पाठीमागून आलेल्या वाहनाची त्यांच्या डोक्याला जोराची धडक झाल्याने त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातावेळी इंडोकाउंट मिलमधील कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.
या अपघातास कारणीभूत असलेल्या महामार्गाने साईट पट्ट्या टाकलेल्या मुरमामुळे हा अपघात झाला असून याला जबाबदार कोण? शिवाय याच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार अशी चर्चा यावेळी मिलमधील कामगार करत होते. अमर याच्यामागे दोन मुले व पत्नी व भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ताबडतोप पंचनामा करून मृतदेह हालवून वाहतूक सुरळीत केली.