प्रतिनिधी/ वाळपई
सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रातील मुरमुणे याठिकाणी एका बार व रेस्टॉरंट या ठिकाणी सुरू असलेल्या जुगारी अड्डय़ावर पोलिसांनी धाड घालून एकूण चार जणांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात साधनसामग्री जप्त करण्यात आली असून याबाबतची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे .
याबाबतची माहिती अशी की मुरमुणे या ठिकाणी असलेल्या दुर्गा बार व रेंस्टारंट याठिकाणी मोठय़ा प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी सापळा रचून शनिवारी दुपारी सदर अड्डय़ावर धाड घालून शशिकांत वाघेकर (51 वर्षे राहणार मुरमुणे) श्रीकांत भामईकर( 41 वर्षे राहणार मुरमुणे) दशरथ सांगोडकर (वय वर्षे 27 राहणार मुरमुणे) व गोकुलदास नाईक (वय वर्षे 51 राहणार पैकुळ सत्तरी) या चार जणांना अटक करण्यात यश आले आहे . सदर जुगार अड्डय़ावर मोठय़ा प्रमाणात नागरिक खेळत होते मात्र इतरांनी पलायन करण्यास यश मिळविले .याचारही जणावर जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
दरम्यान गेल्या काही वर्षापासून सदर ठिकाणी मोठय़ा प्रमाणात जुगार अड्डा सुरू होता. याबाबतची माहिती वाळपई पोलीस स्थानकाला देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत करण्यात आली नव्हती. मात्र अचानकपणे वाळपई पोलिसांनी सदर प्रकारची कारवाई केल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की ज्या मद्यविक्री दुकानावर हा अड्डा सुरू होता त्या दुकानाच्या मालकावर मात्र अजूनपर्यंत गुन्हा कसा काय नोंद करण्यात आला नाही अशाप्रकारचा सवाल तमाम नागरिकांनी व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सदर मालक मोठय़ा प्रमाणात याठिकाणी जुगार अड्डा चालवित आहे .मात्र पोलिसांनी धाड घालून इतरांना अटक केली व दुकान मालकाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल पोलिसांच्या कारवाईबाबत स्थानिकात चर्चा निर्माण झाली आहे.