वृत्त संस्था / चेन्नई
लंकेचा माजी जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज 49 वर्षीय मुथय्या मुरलीधरन याला येथील सिटी हॉस्पिटलमधून सोमवारी उशिरा डिस्चार्ज देण्यात आले आहे.
मुरलीधरनला काही दिवसापूर्वी हृदयामध्ये वेदना होवू लागल्याने त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लॅस्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिटी हॉस्पिटलमधील आंतरराष्ट्रीय कार्डिओलॉजिस्ट डॉ.जी.सेंगोटुवेलु यांनी मुरलीधरनवर ही शस्त्रक्रिया केली.
आयपीएल स्पर्धेतील खेळणाऱया सनरायजर्स हैदराबाद संघाच्या साहाय्यक प्रशिक्षक वर्गामध्ये मुरलीधरनचा समावेश आहे. काहीच दिवसात मुरलीधरन हैदराबादच्या चमूत दाखल होणे अपेक्षित आहे. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये 133 सामन्यांत 800 बळीं घेतले आहेत. तसेच त्याने 350 वनडे सामन्यांत 534 तर 12 टी-20 सामन्यांत 13 बळी घेतले आहेत. 1996 साली आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱया श्रीलंका संघामध्ये त्याचा समावेश होता.