ब्रिटनमध्ये शालेय मुलांचा खोडकरपणा
ऑरेंज ज्युसच्या मदतीने कोरोनाचा फेक पॉझिटिव्ह अहवाल
मुले अत्यंत खोडकर असतात, शाळेत जाऊ लागू नये म्हणून ती अनेक प्रकारची कारणे शोधत असतात. ब्रिटनमध्ये एक असेच ‘अनोखे निमित्त’ समोर आले आहे. येथील काही शालेय मुले ऑरेंज ज्युसद्वारे कोरोनाचा बनावट पॉझिटिव्ह अहवाल तयार करवून घेत आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह असल्यास मुलांना शाळेत दोन आठवडय़ांची सुटी मिळते. पण आता या मुलांचा भांडाफोड झाला आहे. मुले कोरोनाच्या रॅपिट अँटीजेन टेस्टदरम्यान स्वॅबच्या ऐवजी ऑरेंज ज्युसचा वापर करत असल्याचे येथील शिक्षकांना कळले आहे.
कोरोनाच्या अशा बनावट अहवालांविषयी कळल्यावर ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने स्वतः याची तपासणी प्रयोगशाळेत करविली आहे. या तपासणीदरम्यान ऑरेंज ज्युसमध्ये विषाणू नव्हता, ज्युसमध्ये असलेल्या आम्लामुळे टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह येत होता असे आढळून आले आहे. ऑरेंज ज्युसच नव्हे तर इतर ड्रिंक, केचअप आणि कोकाकोलाच्या वापराद्वारेही रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह अहवाल येत आहे.
येथील मुले अशाप्रकारचा अहवाल दाखवून दोन आठवडय़ांची सुटी घेत असल्याचे ब्रिटनच्या एका विज्ञानाच्या शिक्षकाने सांगितले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडनच्या प्राध्यापिका एंड्रिया सेला यांनी हा शोध हैराण करणारा नसल्याचे म्हटले आहे. जर कुणी जाणूनबुजून प्रोटोकॉल तोडत असल्यास निश्चितपणे चुकीचा निष्कर्ष प्राप्त होणार आहे. पण खऱया अर्थाने हा ‘फॉल्स पॉझिटिव्ह’ नाही, कारण प्रोटोकॉलचे योग्य पालन करण्यात आलेले नसते असे त्या म्हणाले.
व्हायरल होतेय ट्रिक
ब्रिटनमध्ये सध्या अशी ट्रिक टिकटॉक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. अशाप्रकारच्या एका व्हिडिओला तर 6.5 दशलक्षांहून अधिक ह्यूज लाभले आहेत. बफर सोल्युशनसोबत धुवूनन ‘बनावट’ पॉझिटिव्ह अहवाल तयार करविणे शक्य आहे. पण एकदा पीएच व्हॅल्यू दाखविल्याच्या काही वेळानंतर किटवरून लाइन गायब होते अशी माहिती हल विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक मार्क लोर्च यांनी दिली आहे.