मुस्लीम समाजातील मुलींच्या लग्नाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय
चंदीगढ / वृत्तसंस्था
मुस्लीम मुलगी अल्पवयीन असली तरीदेखील तिचा निकाह वैध असल्याचे मतप्रदर्शन पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने केले आहे. प्रेमविवाह केलेल्या एका मुस्लीम दाम्पत्याच्या सुरक्षेशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिपण्णी केली. मुलींसाठी लग्नाचे वय 18 पूर्ण तर मुलांसाठी 21 वर्षे पूर्ण असणे कायद्याने बंधनकारक आहे. जर त्यापेक्षा कमी वय असेल तर संबंधित विवाह बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जाते. पण त्याच पार्श्वभूमीवर पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
मोहाली येथील एका मुस्लीम जोडप्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. ‘मुस्लीम पर्सनल लॉ’चा हवाला देत जर मुस्लीम समाजातील मुलगी तरुण असेल पण सज्ञान नसेल तरीही तो विवाह वैध असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुस्लीम समाजातील मुलगी वयात आल्यावर विवाह करण्याचा तिला अधिकार असल्याचे स्पष्ट होते.
मोहाली येथील एका जोडप्याने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन निकाह केला आहे. या निकाहमुळे दोन्हीकडचे कुटुंबीय नाराज आहेत. त्यामुळे या दाम्पत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यातील तरुणाचे वय 36 वर्षे आहे तर मुलीचे वय 17 वर्षे आहे. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिला आमच्याकडे सोपवण्यात यावे, असे मुलीच्या कुटुंबियांनी म्हटले होते. मात्र, त्यांची ही मागणी अग्राहय़ ठरविण्यात आली आहे. ‘मुस्लीम प्रेमविवाहासंदर्भात मुलीने प्रौढ असणे गरजेचे नाही. मुलगी समजूतदार असल्यास तिला आपला जोडीदार निवडायचा अधिकार आहे. संविधानानेच तिला स्वतंत्ररित्या आणि आवडता जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला आहे’, अशी स्पष्टोक्ती न्यायालयाने दिली. त्याचबरोबर मोहालीच्या पोलीस अधीक्षकांना संबंधित मुस्लीम दाम्पत्याच्या सुरक्षेचा आढावा घेत त्यांना सुरक्षा प्रदान करावी, असे आदेशही दिले आहेत.