आठवडाभर काम केल्यानंतर सुट्टीच्या दिवशी रिलॅक्स व्हावे असे प्रत्येकालाच वाटते. रिलॅक्स होण्यासाठी मुलांबरोबर वेळ घालवण्या इतका दुसरा उत्तम पर्याय नाही. परंतु काही वेळा मुलांना सुट्टीच्या दिवशी सांभाळणे अवघड वाटते. मूल दंगा करायला लागले तर कंटाळाही येतो. परंतु हा विकएंड आनंददायी बनवायचा असेल तर त्यासाठी काही गंमतीजमतीचे नियोजन थोडे अधिक करून ठेवले पाहिजे. यामुळे मुलांनाही मजा येईल आणि तुमचा विकएंडही आनंदात जाईल. त्यासाठी काही मजेशीर ऍक्टिव्हटीज कशा प्रकारे करता येतील हे जाणून घेऊ.
- पेपर प्लेट मास्क : घरात ठेवलेल्या पेपरप्लेट्स घ्याव्यात. सोबत मुलांची कात्री घ्यावी, मुलांना त्यांच्या रंग व ब्रश सोबत आपल्या जवळ घेऊन बसावे. मुलांना त्या पेपरप्लेटवर आपल्या कल्पनेनुसार पेन्ट करू द्यावे. मुलांना फेसमास्कला असते तसे डिझाईन पेन्ट करायला लावावे. प्लेटला दोन्ही बाजूला भोके पाडून त्यामध्ये दोरी बांधावी, स्वतः बनवलेले फेसमास्क चेहर्यावर लावताना मुलांना खूप मजा वाटेल.
- गार्डनिंग : यामुळे मुलांमध्ये निसर्गाबद्दल आपोआप आवड निर्माण होईल. आपल्या मुलांना झाड लावणे, बी पेरणे शिकवावे. मुलांसाठी हा केवळ नवे काही शिकण्याचा अनुभव नसेल तर निसर्गाप्रती तो मुलांना जबाबदारही बनवेल.
- पिगी बँक बनवा : घरात पडलेला एखादा बॉक्स किंवा डबा घ्यावा. तो मुलांना त्यांच्या पसंतीने सजवू द्यावा. या बॉक्समध्ये त्यांना बक्षीस म्हणून मिळालेले पैसे, पाहुण्यांनी दिलेले पैसे किंवा काही नाणी टाकायला द्यावीत. यामुळे मुलांना बचत करण्याची सवय लागेल आणि वीकेंडचा वेळही सत्कारणी लागेल.
- स्टिक पपेट : आईस्क्रिमस्टीक घेऊन त्यावर मुलांना पक्षी किंवा एखादा प्राणी काढण्यास सांगावे. याचा वापर बुकमार्क म्हणूनही करता येऊ शकतो.
- व्हेजिटेबल ड्रॉईंग : भेंडी, कांदा आणि अन्य भाज्यांचे छोटे तुकडे कापावेत. हे तुकडे मुलांच्या हातात द्यावेत आणि ते रंगामध्ये बुडवून त्याचा छाप पेपरवर उमटवून चित्र काढायला लावावे.
- यामुळे नव्या पद्धतीने चित्रकला त्यांना शिकायला मिळेल आणि अशा गोष्टींमध्ये मुले रमतीलही.