पित्याने खर्च केले साडेआठ लाख रुपये बसला लाकडी टँकमध्ये केले रुपांतरित
सर्वसाधारणपणे टँक (रणगाडा) अत्यंत धोकादायक असतो, जो कुठल्याही भूभागाला उद्ध्वस्त करण्यासाठी वापरला जातो, परंतु व्हिएतनामच्या एका व्यक्तीने तयार केलेला रणगाडा त्याच्या पेमाचे प्रतीक आहे. ट्रुआंग वैन डाओ नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या मुलांच्या राइडसाठी एका बसला रणगाडय़ात रुपांतरित केले आहे. या टँकमधून ते स्वतःच्या मुलांना सैर घडवून आणत आहेत.
31 वर्षीय ट्रुआंग हे हनोईनजीक बॅक निन्ह प्रांतात राहतात. त्यांनी स्वतःच्या कलेचे प्रदर्शन करत एका 16 आसनी मिनीबसला प्रेंच ईबीआर 105 मॉडेल वुडन टँकमध्ये बदलले आहे. ट्रुआंग हे पेशाने कारपेंटर असून त्यांनी टँकला एका सामान्य कारप्रमाणे तयार केले आहे. जगातील सर्व रणगाडे आमच्या वुडन टँकप्रमाणेच नुकसान पोहोचविणारे नसते तर मजा आली असती असे त्यांचे म्हणणे आहे.
3 महिन्यांच्या मेहनतीनंतर डाओ यांनी मुलांसाठी हा अनोखा टँक तयार केला असून याकरता 8 लाख 33 हजारांहून अधिक रुपये खर्च केले आहेत. टँकच्या निर्मितीत त्यांनी दोन सहकाऱयांची मदत घेतली. टँकमध्ये 2.8 मीटर लांब तोफ असून त्यांनी इंजिन म्हणून मिनीबस फ्लोरचाच वापर केला आहे. या टँकच कमाल वेग 25 किलोमीटर प्रतितास इतका आहे. वुडन टँकमधून ट्रुआंग आणि त्यांचा मुलगा नजीकच्या भागांमध्ये जात असतात. आठवडय़ाच्या अखेरीस स्वतःच्या मुलासोबत यातून प्रवास करतात. ट्रुआंग यांनी यापूर्वी लाकडी कार तयार केली होती.