यकृताशी संबंधित आजारांचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. भारतात दरवर्षी जवळपास दहा लाख लोकांना यकृताचे आजार जडत असल्याची बाब एका अभ्यासातून समोर आली असून यामुळे मोठय़ा प्रमाणावर मृत्यूही होत आहेत. लहान मुलांनाही यकृताशी संबंधित आजारांचा मोठा धोका आहे. यकृत हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव. अन्नपचनापासून शरीरातले विषारी घटक बाहेर टाकणं, विविध अवयवांना रक्ताचा पुरवठा करण्यापर्यंत विविधं कामं यकृत करत असतं. यकृतात बिघाड झाल्यामुळे या कार्यांमध्ये अडथळे येतात आणि विविध आजारांना निमंत्रण मिळतं. मध्यंतरी एका सहा वर्षांच्या मुलावर यकृत प्रत्यारोपणाची शत्रक्रिया करण्यात आली. यावरूनच आपल्याला यकृताशी संबंधित आजारांचा आवाका लक्षात येईल. हेपिटायटिस, यकृताचा दाह, विविध कारणांमुळे होणारी यकृताची हानी असे आजार जडू शकतात. लहान मुलांमधली यकृताच्या आजाराची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती घेऊ या.
नवजात अर्भकांना काविळ होण्याची शक्यता असते. यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर मृत्यूही होऊ शकतो. लिव्हर सिर्होसिस हा सुद्धा अत्यंत घातक असा आजार आहे. यात यकृतातल्या पेशींचं प्रमाण कमी होतं आणि या पेशींसोबतच फायबर पेशींची निर्मिती होऊ लागते. या स्थितीला लिव्हर सिर्होसिस असं म्हटलं जातं. मुलांना नॉन फॅटी लिव्हर डिजिज होऊ शकतो. मुलांमध्ये यकृत निकामी होण्याचा धोकाही वाढत चालला आहे. यकृताच्या कार्यात अडथळे येऊ लागल्यास सतत थकवा जाणवतो. यामुळे दैनंदिन कामं करताना बर्याच अडचणी येतात. लहान मुलं सारखी दमत असतील तर वेळेत तपासणी करून घ्यायला हवी. शरीराला येणारी खाज हे सुद्धा यकृताच्या आजाराचं लक्षण असू शकतं. शरीर सतत खाजत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. यकृताच्या आजारांमध्ये वारंवार उलटय़ा होतात. या उलटय़ांकडे फारसं लक्ष दिलं नाही तर आजाराची तीव्रता वाढू शकते.
मुलांमध्ये यकृताशी संबंधित आजार वाढत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे आणि त्यातही आहाराकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. तेलकट पदार्थांचा अतिरेक, जंक फूड, मैदानी खेळ न खेळणं, स्मार्टफोनचा अतिवापर यामुळे मुलं स्थूल होत चालली आहेत. हे वाढलेलं वजन यकृताच्या आजारांना निमंत्रण देऊ शकतं. त्यामुळे मुलांना सकस आहार द्या. त्यांना आरोग्यदायी जीवनशैलीचं महत्त्व समजावून सांगा. मैदानी खेळ खेळायला प्रोत्साहन द्या. मुलांच्या आजारात फळं, भाज्या, सुकामेवा यांचा समावेश करा. मैद्याचे पदार्थ, गोडाचं प्रमाण कमी करा. मुलांमध्ये यकृताच्या आजारांशी संबंधित लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.