2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 400 टक्क्यांची भर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात मुलांच्या विरोधातील सायबर गुन्हे 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 400 टक्क्यांपेक्षा अधिक दराने वाढले आहेत. यातील बहुतांश गुन्हे लैंगिक कृत्यांमध्ये मुलांना चित्रित करणाऱया सामग्रीचे प्रकाशन आणि प्रसारणाशी निगडित आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) नव्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार 2020 मध्ये मुलांच्या विरोधातील सायबर गुन्हय़ांची 842 प्रकरणे नोंदली गेली होती. यातील 738 म्हणजेच 87 टक्के प्रकरणे अल्पवयीनांना लैंगिक कृत्यांमध्ये लिप्त दाखविण्याशी संबंधित आहेत. याच्या तुलनेत 2019 मध्ये मुलांच्या विरोधात झालेले एकूण 164 सायबर गुन्हे नोंद झाले होते. 2020 च्या तुलनेत हा आकडा 413 टक्क्यांनी कमी आहे. 2017 आणि 2018 मध्ये हे आकडे अनुक्रमे 79 आणि 117 इतके होते.
उत्तर प्रदेशात सर्वाधिक
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार मागील वर्षी मुलांच्या विरोधात झालेल्या ऑनलाईन गुन्हय़ांची सर्वाधिक 170 प्रकरणे उत्तर प्रदेशात नोंद झाली आहेत. त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तेथे मुलांच्या विरोधात झालेल्या गुन्हय़ांची 144 आणि 137 प्रकरणे नोंदविली गेली आहेत. केरळ (107) आणि ओडिशा (71) या यादीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.
जोखीम वाढण्याचे कारण
शैक्षणिक आणि व्यावसायिक कारणासाठी इंटरनेटवर अधिक काळ व्यतित केला जात असल्याने मुलांसाठी जोखीम वाढली आहे. यात लैंगिक शोषण, अश्लील संदेशांचे आदान-प्रदान, पोर्नोग्राफीच्या संपर्कात येणे आणि सायबर-धमकी यासारखी जोखीम सामील असल्याचे चाइल्ड राईट्स अँड यूच्या सीईओ पूजा मारवाह यांनी म्हटले आहे.
जाणीवेचा अभाव
मुलांना ऑनलाईन व्यासपीठावर ज्या जोखमींचा सामना करावा लागू शकतो, त्याबद्दल शिक्षक आणि समाजातील जाणीव खूपच मर्यादित किंवा कमी आहे. मुलांना काय माहित असावे हे त्यांना समजाविण्याची गरज असल्याचे मारवाह म्हणाल्या.