विमानसेवा बंद असल्याने ओढवली परिस्थिती
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या परिस्थितीचा फटका अनेक मंडळींना अनेक मार्गाने बसला आहे. मात्र आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर अंत्यविधीलाही उपस्थित राहण्याची संधीदेखील परदेशातील मुलाला मिळू शकली नाही. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या दुर्दैवी परिस्थितीला शरण जाण्याची वेळ नागरिकांवर आल्याचे उदाहरण यामधून सामोरे आले आहे. सेवानिवृत्त बँक अधिकाऱयाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाच्या अनुपस्थितीत शेजाऱयांना त्यांचा अंत्यविधी उरकावा लागला. या घटनेमुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मूळचे कुंदापूर आणि सध्या गणेशपूर येथील रहिवासी असणारे के. पी. केशवराव (वय 75) यांचे दि. 25 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सिद्धार्थ हा सध्या दुबई येथे वास्तव्यास आहे. तसेच आणखी एक कन्या आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा बंद असल्यामुळे त्याला बेळगावला पोहोचता आले नाही.
केशवराव यांच्या पत्नीचे देखील एक वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे एकाकी अवस्थेत निवृत्तीचे जीवन कंठत होते. अशावेळी त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर शेजाऱयांनी त्यांना दवाखान्यात नेले. परंतु उपचाराचा उपयोग न होता त्यांचे निधन झाले. शेजारी असणाऱया रहिवाशांनी त्यांचा अंत्यविधी पार पाडला. के. पी. केशवराव हे सिंडिकेट बँकेमध्ये व्यवस्थापक म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले होते. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.