दिल्लीत राजद प्रमुखांनी सुरू केला ‘खेला’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षी होणाऱया उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतून एक मोठे राजकीय छायाचित्र समोर आले आहे. राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांची समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव आणि सप अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत भेट झाली आहे. अखिलेश यांनीच ट्विटरवर यासंबंधीची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. या भेटीत कुठल्या मुद्दय़ांवर चर्चा झाली हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी झालेल्या या भेटीमुळे लालू यादव यांनी दिल्लीत ‘खेला’ सुरू केल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. लालू यादव काही महिन्यांपूर्वीच चारा घोटाळय़ाप्रकरणी जामिनावर सुटले आहेत. दिल्लीत मुलगी मीसा भारती यांच्या निवासस्थानी ते वास्तव्य करत आहेत. प्रकृती फारशी साथ देत नसली तरीही लालूंचे राजकीय डावपेच सुरूच आहेत.
लालूंनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार आणि सप नेते रामगोपाल यादव यांची भेट घेतली होती. जामिनावर बाहेर पडल्यापासून लालूप्रसाद पुन्हा राजकारणात सक्रीय दिसून येत आहेत. विरोधी पक्षांच्या राजकारणाच्या नेतृत्वाच्या शर्यतीत उतरण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो.