माजी खासदाराच्या विधानावरून वाद
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू होताच माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. कोचीच्या एका महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी संवाद साधणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी जॉर्ज यांनी केली आहे. या टिप्पणीवर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.
इरातयर येथील प्रचारसभेला संबोधित करताना माकपशी जवळीक असलेले माजी खासदार जॉर्ज यांनी राहुल गांधी यांच्यासंबंधी हे विधान केले आहे. तर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्याची एलडीएफची भूमिका नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
राहुल गांधी केवळ महिला महाविद्यालयांचा दौरा करतात आणि मुलींनी काँग्रेस अध्यक्षांशी संवाद साधताना सतर्क रहावे. राहुल विवाहित नसल्याने मुलींनी त्यांच्यासमोर वाकून उभे राहू नये असे जॉर्ज यांनी म्हटले आहे.
मागील सोमवारी राहुल गांधी यांनी कोची येथील सेंट तेरेसा महाविद्यालयात एका विद्यार्थिनीच्या विनंतीवर तिला जपानी मार्शल आर्ट ऐकिडोची माहिती दिली होती. तर जॉर्ज यांची ही टिप्पणी याच्याशीच संबंधित असल्याचे मानण्यात येत आहे.
विधानाची झाली निंदा
काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी राहुल गांधी यांच्या विरोधातील टिप्पणीला दुर्दैवी आणि अस्वीकारार्ह ठरविले आहे. या विधानाच्या विरोधात जॉइस यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीतील पराभव दिसू लागल्याने डाव्या पक्षांचे नेते अशी विधाने करत असल्याचे काँग्रेसकडून नमूद करण्यात आले आहे.