गुरे घेऊन गेली असता कोंडये येथील घटना : मुलगी सुदैवाने बचावली
प्रतिनिधी / कणकवली:
चारण्यासाठी नेलेली गुरे घेऊन परतत असताना मयुरी मंगेश तेली (40) या विवाहितेचा वाटेत लागणाऱया ओढय़ात पाय घसरल्याने वाहून गेल्याने मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेतील मयुरी तेली यांचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. पाय घसरून पडताना सौ. मयुरी यांच्यासोबत एकमेकांचा हात धरून असलेली त्यांची मुलगी दक्षता (14) हीसुद्धा पडणार होती, मात्र घसरताना दक्षताच्या हाताला काठी लागल्याने ती बचावली. मात्र डोळय़ादेखत आईला वाहून जाताना पाहण्याचे दुर्दैव दक्षताच्या नशिबी आले. ही घटना फोंडाघाटनजीकच्या कोंडये गावात घडली. मयुरी यांच्या पश्चात पती, मुलगी, सासू, दीर असा परिवार आहे.
कोंडये येथील मयुरी तेली या मंगळवारी करंजे व कोंडये सीमेवरील ‘मडयेचा व्हाळ’ येथे आपली मुलगी दक्षतासमवेत नेहमीप्रमाणे गुरे राखण्यासाठी रानात गेली होती. त्याचवेळी सायंकाळच्या सुमारास पावसाची मोठी सर आली. मुसळधार कोसळणाऱया पावसामुळे अचानक तेथील ओढय़ांनाही पाणी आले.
मयुरी पाय घसरून पडल्या
सायंकाळी 6.30 च्या सुमारास तेथील ओढय़ातूनच सौ. मयुरी व दक्षता या गुरे घेऊन घरी परतत असताना ओढय़ाला आलेल्या पाण्यात मयुरी व दक्षता या एकमेकांचा हात धरून येत होत्या. त्याचवेळी मयुरी यांचा पाय घसरला व दक्षताचा हात सुटला. त्याचवेळी दक्षता हिच्या हाताला काठी लागल्याने ती बचावली. सौ. मयुरी वाहून जाऊ लागल्या. दक्षताने त्याही परिस्थितीत गावात धाव घेत आरडाओरडा करीत ‘आई वाहून गेली’ असे शेजारी व घरी जाऊन सांगितले.
मृतदेह झाडाला अडकलेला
ग्रामस्थांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत, शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुसळधार पाऊस व रात्र होत आल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. बुधवारी सकाळीच ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. यावेळी मयुरी यांचा मृतदेह घटनास्थळापासून साधारण दोन किमी अंतरावर एका झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.
तहसीलदारांसह प्रशासनाची भेट
दरम्यान, कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी सकाळी सात वाजता घटनास्थळी भेट दिली. तसेच मंगेश तेली यांच्या घरीही भेट दिली. यावेळी मंडळ अधिकारी नीलिमा प्रभूदेसाई, तलाठी मारुती सलाम उपस्थित होते. घटनास्थळी मदतीसाठी पोलीस पाटील संदेश मेस्त्राr, ग्रा. पं. सदस्य उमेश मेस्त्राr, सचिन परब, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष आनंद परब, रवींद्र तेली, दिलीप तेली, सीताराम आंबेरकर, दिलीप परब, किरण रेडकर, राजा डिचवलकर, महेंद्र डिचवलकर, संदीप रासम आदींनी धाव घेतली. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक जनदिश बांगर, पोलीस हवालदार वंजारे, महसूल मंडळ अधिकारी नीलिमा प्रभूदेसाई, तलाठी मारुती सलाम या पथकांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले. फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जंगम यांनी शवविच्छेदन केले. यावेळी आशा सेविका सीमरन तांबे उपस्थित होत्या. या घटनेची खबर मयुरी यांचा दीर संजय पुंडलिक तेली यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली.