प्रतिनिधी / सातारा :
फलटण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याच मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलास फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दि. 24 सप्टेंबर रोजी या अत्याचारास कंटाळून मुलीने गवतावर मारण्याचे औषध पिले. पुण्यावर तिच्यावर उपचार सुरु असताना शुध्दीवर आल्यावर तिने तिच्या आईला सांगितल्यावर हा प्रकार समोर आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या मुलीचा पिता वेळावेळी तिच्याशी अश्लिल भाषा वापरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत होता. तर दि. 23 सप्टेंबर रोजी त्याच गावातील एका अल्पवयीन मुलाने मुलगी शेतात गवत आणण्यासाठी गेली असताना तिचा हात धरुन तिला शेतातील गवतात नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. यावेळी मुलगी आरडाओरडा करत असताना मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्या मुलीने याबाबत कोणास काही सांगितले नाही.
दरम्यान, दि. 24 रोजी या अल्पवयीन मुलीने या घटनांच्या कारणातूनच सकाळी 11 वाजता गवतावर मारण्याचे औषध पिले. त्यामुळे तिला प्रथम फलटण येथील हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तिथे मुलगी शुध्दीवर आल्यावर तिने तिच्या आईला हा प्रकार सांगितला. तिच्या आईने समर्थ पोलीस ठाणे पुणे येथे दोन्ही संशयितांविरुध्द तक्रार दिल्यानंतर ती तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. पोलिसांनी मुलीच्या पित्यासह तिच्यावर अत्याचार करणाऱया अल्पवयीन मुलाला दि. 3 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले असून या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे करत आहेत.