प्रतिनिधी/ सातारा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिवाजी साळुंखे (वय 80, रा. मजरे शेंबडी ता. जावली याला विशेष सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये शिक्षा ठोठावली.
2017 नवरात्रौत्सवाच्या काळात जिवाजी रामचंद्र साळुंखे हा मजरे शेंबडी, ता. जावली तेथीलच जननी मंदिरात देखभालीचे काम करत होते. त्याच्यासोबत अन्य एकजण मंदीर देखभालीचेच काम करीत असे. त्या कामगाराची अल्पवयीन मुलगी मदत करण्यासाठी मंदिरात राखणीचे काम करण्यासाठी आली होती. त्यावेळी कोणी नसताना जिवाजी साळुंखे याने मंदिरातील लाईट विझवून त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यामुळे पिडीत मुलीने या घटनेबाबत कोणाला काही सांगितले नाही.
कालांतराने त्या पिडीत मुलीला मासिक पाळी न आल्याने तिच्या आईने तिला तपासणीसाठी सातारा जिल्हा रूग्णालयात घेवून गेली असता. पिडीत मुलगी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या आईने तिला विश्वासात घेवून विचारले असता नवरात्रौत्सवाच्या काळात जिवाजी साळुंखे याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. याबाबत 11 जानेवारी 2018 रोजी मेढा पोलीस ठाण्यात जिवाजी साळुंखे याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मेढा पोलीस ठाण्याचे तत्कालिन उपनिरीक्षक श्रीमंत झाजुंर्णे यांनी या गुह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रत्यक्ष खटल्याच्या कामकाजास सुरूवात झाल्यानंतर एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले होते.
अंतिम सुनावणीत मंगळवारी अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी जिवाजी रामचंद्र साळुंखे याला 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी बाल लैंगिक कायद्यान्वये शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून अनुपमा घार्गे-गाढवे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक संजयराजे भोसले यांनी कामकाज पाहिले. त्यांना पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, उपनिरीक्षक घार्गे, हवालदार शेख, कॉन्स्टेबल कांचन बेंद्रे, रिहाना शेख, राजू कुंभार, अजित शिंदे यांनी त्यांना सहकार्य केले.