अफगाणिस्तानातील सातत्याने बिघडणाऱया स्थितीनंतर अमेरिकेची चिंता अधिकच वाढली आहे. काबूलमधून लोकांना बाहेर काढू पाहणाऱया अमेरिकेला तालिबानच्या धमकीला तोंड द्यावे लागत आहे. याचदरम्यान अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे संचालक विलियम जे बर्न्स यांनी काबूलमध्ये तालिबानी म्होरक्या मुल्ला अब्दुल गनी बरादर यांची गुप्त भेट घेतली आहे. अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जानंतर बायडेन प्रशासन आणि तालिबान यांच्यातील ही पहिली उच्चस्तरीय बैठक असल्याचे सांगण्यात येते.
ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. काबूलमधून लोकांना बाहेर काढणे थांबवा असा इशारा तालिबानने काही दिवसांपूर्वी अमेरिकेला दिला होता. तालिबान आता 31 ऑगस्टपर्यंतच्या मुदतीची प्रतीक्षा करत आहे. काबूल विमानतळावर सद्यकाळात अमेरिकेचे सुमारे 6 हजार सैनिक आहेत. विमानतळ परिसराबाहेर तालिबानचे दहशतवादी अफगाणच्या नागरिकांना धमकावत आहेत.