प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील मुळगाव – मराठी शाळेजवळ बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर येथील पोलिसांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत २५ हजार ६५० रूपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला असून याप्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे.
अनंत बाबू वारेकर (५५, रा. मूळगाव मराठी शाळेजवळ) असे ताब्यात घेतलेल्या दारूविक्रेत्याचे नाव आहे. तो अवैधपणे दारूची विक्री करत असल्याची कुणकुण लागताच जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व पथकाने सापळा रचला.
त्यानुसार टाकलेल्या धाडीत ८४५ लीटर दारूचा साठा पोलिसांनी हस्तगत केला. ही दारू त्याने चिपळूण काशिमठ येथील पेडणेकर याच्याकडून आणल्याचे पुढे आले आहे. त्यानुसार पेडणेकर याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल बुरोंडकर, पोलीस शिपाई पवार, कोरे, जाधव, चालक वळवी यांचा समावेश होता. या धडक कारवाईने बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.