राज्यातील आणि देशातीलही एकमेव घटना
प्रतिनिधी / डिचोली
मुळगाव येथील धाकटी वनदेवी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत मुळगवातील हिराबाई नागेश परब या 108 वर्षीय वृध्द महिलेने केंद्रात येऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. 108 वषीय महिलेने लस घेणे ही बाब राज्यात आणि देशातीलही एकमेव घटना असल्याचे सांगण्यात आले.
‘टीका उत्सव’ या नावाने सध्या सर्वत्र सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत धाकटी वनदेवी सभागृह मुळगाव डिचोली येथे भाजप मंडळ, भाजप वैद्यकीय विभाग आणि डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लसीकरण मोहिमेत मुळगावातील 223 जणांनी लसीचा पहिला डोस काल बुधवारी घेतला. यावेळी सभापती राजेश पाटणेकर, आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मेधा साळकर, भाजप मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, भाजप महिला प्रदेश सरचिटणीस शिल्पा नाईक, मुळगावच्या उपसरपंचा आनंदी परब, नगरसेविका दिपा शिरगावकर, श्रुती घाटवळ व इतरांची उपस्थिती होती.
काळजीबरोबच लसही घ्यावी : पाटणेकर
कोरोना लसीकरण आज सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. देशभरात आणि राज्यातही वाढत चाललेली रूग्णांची संख्या पाहता प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या घरगुती पध्दतीने काळजी घेत असतानाच लसही घेणे अत्यावश्यक आहे. आपले आणि आपल्या कुटुंबीय तसेच समाजातील लोकांच्या काळजीपोटी लस घेण्यास पुढाकार घ्यावा, असे सभापती राजेश पाटणेकर यांनी म्हटले.
आज मुळगावात 108 महिलेने कोविड लस घेण्यासाठी घेतलेला पुढाकार पाहता सामान्य लोकांनी या लसीबाबत असलेल्या सर्व भितींना तिलांजली देत लस घेण्यासाठी पुढे यावे. आपले सामाजिक दायित्व ओळखून सर्वांनी लस घेताना आपल्या आणि इतरांचीही काळजीपोटी पुढे यावे, असे आवाहन यावेळी डॉ. शेखर साळकर यांनी केले.