वृत्तसंस्था/ मुंबई
भाजपचे नेते तसेच मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांनी अखिल भारतीय मुष्टियुद्ध संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला आहे.
अखिल भारतीय मुष्टियुद्ध संघटनेची ही निवडणूक 18 डिसेंबर होणार असून अध्यक्षपदाच्या रिंगणात अजय सिंग आणि आशिष शेलार यांच्यात आता चुरस राहील. आशिष शेलार यांनी आपला उमेदवारी अर्ज अत्यावश्यक बाबी पूर्ण करून बुधवारी दाखल केला. मुष्टियुद्ध संघटनेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात घेतली जाणार होती. पण कोरोना समस्येमुळे ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. गुरुग्राम येथे 18 डिसेंबरला मुष्टियुद्ध संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक बोलाविली असून या बैठकीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. क्रिकेट आणि फुटबॉल या क्रीडा प्रकारांशी माझा यापूर्वी जवळचा संबंध आला आहे. आता मुष्टियुद्ध हा क्रीडा प्रकार अधिक भक्कम करण्याच्या हेतूने मी ही निवडणूक लढवित असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. निवडणूक अर्ज भरण्याची अखेरची तारीख 8 डिसेंबर असल्याचे संघटनेचे सचिव जय कोवली यांनी सांगितले. आशिष शेलार हे वांदे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.