वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पतियाळातील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) केंद्रामध्ये लवकरच मुष्टियुद्ध सराव प्रशिक्षण शिबिर सुरू केले जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी 13 पुरुष आणि 3 महिला मुष्टियोद्धे या केंद्रात शुक्रवारपासून दाखल होण्यास सुरुवात झाली आहे
कोरोना महामारी संकटामुळे जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशातील सर्व क्रीडा हालचाली ठप्प झाल्या होत्या. भारतीय मुष्टियोद्धय़ांना सराव करण्याची संधी उपलब्ध झाली नव्हती. पण आता पतियाळातील ‘साई’च्या केंद्रामध्ये मुष्टियुद्ध प्रशिक्षण सरावाला प्रारंभ केला जाणार आहे. यासाठी पतियाळाच्या केंद्रामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून कोरोनासंदर्भातील सर्व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल, असे भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनचे संचालक सांतियागो नेव्हा यांनी सांगितले. या सराव शिबिरात दाखल होण्यासाठी शुक्रवारपासून विविध ठिकाणातून मुष्टियोद्धे येत आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये आणखी काही मुष्टियोद्धे पतियाळात येणार आहेत. या सर्व मुष्टियोद्धय़ांना सात दिवसांच्या कालावधीसाठी क्वारंटाईन केले जाईल. या सराव प्रशिक्षणाचा पहिला टप्पा 7 ते 10 दिवसांचा राहील. सुरुवातीला या सराव शिबिरात 6 महिला मुष्टियोद्धय़ा सहभागी होणार होत्या. पण त्यापैकी तीन मुष्टियोद्धय़ांनी आपण उपलब्ध राहू शकणार नसल्याचे कळविले आहे. आता या सराव शिबिरात 13 पुरुष आणि 3 महिला मुष्टियोद्धे भाग घेतील. दुखापतीमुळे मनीष कौशिक या शिबिरात दाखल होऊ शकला नाही. अमित पांघल, विकास कृष्णन, आशिष कुमार आणि सतीशकुमार हे पतियाळात येत्या दोन दिवसांत दाखल होणार आहेत.
विविध राज्यातील कोरोना परिस्थिती अद्याप बिकट असल्याने काही मुष्टियोद्धय़ांना या शिबिरासाठी पतियाळात दाखल होण्यासाठी विलंब होत आहे. क्वारंटाईनचा सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात तंदुरुस्तीवर भर दिला जाईल. मे महिन्याच्या अखेरीस केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून या शिबिराला अधिकृत परवानगी देताना कोरोनासंदर्भात सर्व नियमांचे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य दिले जाईल, असेही नेव्हा यांनी सांगितले.