वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पोलंडमधील किलेसी येथे सुरू असलेल्या पुरूष आणि महिलांच्या विश्व युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या चार महिला मुष्टीयोद्धय़ांनी आपल्या वजन गटातून उपांत्य फेरी गाठत चार पदके निश्चित केली आहेत. आशियाई चॅम्पियन विनिका, अल्फिया पठाण, गितिका आणि पूनम यांनी आपल्या वजन गटातून शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले आहे.
भारताच्या या चार महिला स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविल्याने त्यांची किमान कास्यपदके निश्चित झाली आहेत. पानीपतची विनिकाने 60 किलो वजनगटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोलंबियाचा कॅमिलो कॅमेलाचा 5-0 अशा गुणांनी दणदणीत पराभव केला. 81 किलोवरील वजनगटातील 2019 साली आशिया कनिष्ठ गटातील चॅम्पियन अल्फिया पठाणने हंगेरीच्या रेका हॉफमनचा 5-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
महिलांच्या 57 किलो वजनगटात भारताच्या पुनमने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कझाकस्तानच्या सिरीकवर 5-0 अशी मात करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. 45 किलो वजनगटात भारताच्या गितिकाने रूमानियाच्या बलाढय़ इलिसाबेथ होस्टनचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र महिलांच्या 81 किलो वजनगटात भारताच्या खुशिला तुर्कीच्या इसिलडेरकडून हार पत्करावी लागल्याने तिचे या स्पर्धेतील आव्हान समाप्त झाले.
पुरूषांच्या विभागात 75 किलो वजन गटात भारताच्या मनिषने तसेच 69 किलो वजन गटात सुमीतने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना अनुक्रमे जॉर्डनच्या ऍलेरेग आणि स्लोव्हाकियाच्या हॉरवेथ यांचा समान 5-0 अशा गुणफरकाने पराभव केला. मात्र 60 किलो गटात आकाश गोरखा आणि 81 किलो गटात मिनितचे आव्हान समाप्त झाले.