नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आशियाई स्पर्धेतील सुवर्णजेता मुष्टियोद्धा डिंग्को सिंगला दि. 25 एप्रिल रोजी तातडीच्या उपचारासाठी एअर ऍम्ब्युलन्सने दिल्लीत आणले जाणार आहे. डिंग्को फुफ्फुसाच्या कर्करोगाशी झुंजत असून दिल्लीत त्याच्यावर रेडिएशन थेरपी केली जाणार आहे. 41 वर्षीय डिंग्को सिंग सध्या इंफाळमध्ये आहे. वास्तविक, यापूर्वीच त्याला दिल्लीत यावे लागणार होते. पण, राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे त्याला प्रवास करता आला नाही. त्यानंतर भारतीय मुष्टियुद्ध संघटनेने पुढाकार घेत त्याला दिल्लीत नेण्यासाठी एअर ऍम्ब्युलन्सची सोय केली.
यापूर्वी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी मणिपूर सरकारकडे डिंग्को सिंगच्या तब्येतीची चौकशी करण्याची व जवळपास उपलब्ध असलेल्या इस्पितळात त्याच्या उपचारासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंती केली होती. फुप्फुसाच्या कर्करोगाशी झुंजत असलेला अर्जुन व पद्मश्री पुरस्कार जेता डिंग्को सिंग बॅन्टमवेट मुष्टियोद्धा व 1998 बँकॉक आशियाई स्पर्धेतील सुवर्णजेता आहे.
‘सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पण, अर्थातच त्याला रेडिएशन थेरपीची आवश्यकता आहे आणि ते वेळेत मिळणे खूप महत्त्वाचे आहे’, असे भारतीय मुष्टियुद्ध संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक आर. के. सचेती यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
मणिपूरमध्ये रेडिएशन थेरपी करण्याची सुविधा नाही. त्यामुळे, त्याच्यावरील उपचारासाठी गुवाहाटीचा पर्याय होता. पण, क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंग्कोला दिल्लीतील आयएलबीएस केंद्रातच उपचार करुन घ्यायचे होते. डिंग्को सर्व परिस्थिती जाणून आहे. पण, दिल्लीतील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असल्याने सर्व मेडिकल रेकॉर्ड्सची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे, तेथे उपचार करुन घेण्याचा त्याचा आग्रह आहे. अर्थात, याचवेळी दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येचीही त्याला चिंता असल्याचे सूत्रांनी नमूद केले.