वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला मुष्टियोद्धी आणि माजी विश्व विजेती एल. सरिता देवीला कोरोनाची बाधा झाली आहे. मणिपुरमधील इंफाळ येथे सरिता देवी व तिचा पती थोयबा सिंग वास्तव्य करीत आहे.
सरिता देवी आणि तिचा पती थोयबा सिंग यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. सरिता देवीच्या मुलाची कोरोना चाचणी घेण्यात आली पण तो निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. सरिता देवीने आपल्या वैयक्तिक मुष्टियुद्ध कारकीर्दीत पाचवेळा आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक मिळविले आहे. कोरोनाची लागण झालेली सरिता देवी ही भारताची दुसरी मुष्टियोद्धी आहे. यापूर्वी भारताचा आशियाई सुवर्ण पदक विजेता डिंको सिंगला कोरोनाची लागण झाली होती.