वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेची 18 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक कोरोना महामारी समस्येमुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. या निवडणूकीची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.
अखिल भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेचे प्रमुख कार्यालय गुरूग्राम येथे आहे. या ठिकाणी 18 डिसेंबर रोजी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीनंतर फेडरेशनची निवडणूक घेतली जाणार होती. मुष्टीयुद्ध संघटनेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात घेतली जाणार होती पण कोरोना महामारीमुळे ती डिसेंबर महिन्यात घेण्याचे ठरले होते. सध्या दिल्लीतील कोरोना परिस्थिती बिकट होत असून कोरोनाचे रूग्ण अधिक आढळत असल्याने फेडरेशनची निवडणूक पुन्हा दुसऱयांदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष अजय सिंग यांनी दिली. सदर निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलल्याची माहिती प्रत्येक राज्याच्या मुष्टीयुद्ध संघटनेला कळविण्यात आली आहे.