वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनीतील कोलॉन येथे सुरू असलेल्या विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या सतीशकुमारने 91 किलोवरील वजनगटात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य लढतीत सतीशकुमारने फ्रान्सच्या माँझेचा पराभव केला.
राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता तसेच आशियाई स्पर्धेतील माजी कास्यपदक विजेता सतीशकुमारने शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरूषांच्या 91 किलोवरील वजनगटातील उपांत्य सामन्यात फ्रान्सच्या माँझेचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला. आता सतीशकुमार आणि जर्मनीचा टिफेक यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे.
या स्पर्धेत महिलांच्या विभागात 57 किलो वजनगटात भारताच्या साक्षी आणि मनिषा यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या दोघीमध्ये आता सुवर्णपदकासाठी लढत होईल. 57 किलो वजनगटात मनिषाने उपांत्य लढतीत यापूर्वी दोनवेळा विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया भारताच्या सोनिया लाथेरचा 5-0 अशा गुणफरकाने एकतर्फी पराभव केला. या वजन गटातील दुसऱया उपांत्य लढतीत साक्षीने जर्मनीच्या रेमोना ग्राफचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. भारताची आशियाई स्पर्धेतील कास्यपदक विजेती पुजा रायला या गटात कास्यपदकावर समाधान मानावे लागले. हॉलंडच्या फाँटेनने पुजा रायचा पराभव केला. पुरूषांच्या विभागात भारताच्या मोहम्मद हुसामुद्दीन आणि गौरव सोळंकी यांना कास्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरूषांच्या 57 किलो वजनगटात जर्मनीच्या शेडालोव्हने हुसामुद्दीनचा तर फ्रान्सच्या किस्टोहरीने गौरव सोळंकीचा पराभव केला.