वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताचा माजी राष्ट्रीय विजेता मुष्टीयोद्धा दुर्योधन सिंग नेगीला कोरोनाची बाधा झाली असून लागलीच त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती साईच्या प्रवक्त्याने दिली.
भारतीय मुष्टीयोद्धय़ांसाठी पतियाळा येथे राष्ट्रीय सराव प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात 69 वेल्टरवेट गटातील मुष्टीयोद्धा नेगी सहभागी झाला होता. दरम्यान दीपावलीच्या सणासाठी तो आपल्या घरी काही दिवस गेला होता. सण संपवून तो पुन्हा पतियाळात दाखल झाल्यानंतर त्याची कोरोना चांचणी घेण्यात आली. या चांचणीत तो पॉझिटिव्ह आढळला. त्याला येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 34 वर्षीय नेगीने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.