मडगावच्या दिवाणी न्यायालयामागील घरांमध्ये पाणी शिरले, मुंगूल ते बाणावलीदरम्यान पश्चिम बगलरस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी, चिंचोणे येथे शाळेचे छप्पर उडून जाण्याचा प्रकार
प्रतिनिधी /मडगाव
सासष्टीत मुसळधार पावसाचा कहर मागील तीन दिवसांपासून सुरुच असून शुक्रवारी रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पावसाने सासष्टीवासियांना चांगलाच दणका दिला. मडगावातील दिवाणी न्यायालयामागील कित्येक घरांमध्ये पाणी शिरले. कित्येक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले. नद्या, उपनद्या तुडुंब भरून वाहू लागल्याने जवळपासच्या रहिवाशांची पाचावर धारण बसली. चिंचोणे येथील एका शाळेच्या छपराचे पत्रे उडून गेले, तर मुंगूल-बाणावलीदरम्यान ठिकठिकाणी पाणी भरून पश्चिम बगलरस्त्यावरून वाहत असल्याचे दिसून आले.
मडगावच्या दिवाणी न्यायालयामागील परिसर, जो फातोर्डा मतदारसंघाचा भाग आहे, तेथील मोठा नाला व गटारे मागील दशकभरापासून उपसली गेलेली नाहीत. त्यामुळे यंदा मुसळधार पावसात येथील कित्येक घरांमध्ये पाणी शिरले. पहाटे 5 पासून घरांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली होती. पावसाने उसंत न घेतल्याने सायंकाळपर्यंत एक फूटभर पाणी घरांमध्ये साचून राहिल्याची कैफियत एका रहिवाशाने मांडली.
मडगाव पालिकेने मागील 10 वर्षे या भागातील गटारांची साफसफाई करण्याची तसदी घेतलेली नाही. आमच्या घरांना भिडून असलेला मोठा नाला तर पाच-सहा वर्षे उपसला गेलेला नाही. ही पूरसदृश स्थिती म्हणजे मडगाव पालिकेच्या नाकर्तेपणाचा परिपाक असल्याची टीका मार्पुस फर्नांडिस या रहिवाशाने केली. सरकार व मुख्यमंत्री ‘भिवपाची गरज ना’ असे सांगत असले, तरी येथे विपरित परिस्थिती आहे. सरकारने पोर्तुगीज काळात मोडलेली देवळे उभारण्यासारखी मोठी कामे करण्याआधी नाले-गटारे अशा मूलभूत सुविधा जाग्यावर घालाव्यात, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या भागातील घरांमधील सोफा, फर्निचर व अन्य साहित्य पाण्यात भिजल्याने कित्येकांना वित्तहानी सोसावी लागली आहे.
चिंचोणे येथील शाळेचे छत उडाले
चिंचोणे येथील शासकीय प्राथमिक शाळेचे छत उडून जाण्याची घटना घडली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात हे छत बदलण्यात आले होते. पूर्वी छत मंगलोरी कौलांचे होते. शाळेतील मुले बाहेर खेळत असताना चेंडू आदळून छताची कित्येक कौले खराब झाली होती. त्यामुळे सरकारी अधिकाऱयांनी त्या जागी गॅल्वनाइज्ड शीट मटेरिअलचे छत टाकले होते. यावेळी ग्रामस्थांनी ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याचे सांगूनही त्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री वाऱयासह आलेल्या पावसात ते छप्पर उडून गेले. हा करदात्यांच्या पैशांचा संपूर्णपणे अपव्यय आहे, अशी टीका आता ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे. छप्पर उडाल्याने पावसाच्या पाण्यात शाळेतील कॅरम बोर्ड, कपाट, बाक व अन्य उपकरणे खराब झाली आहेत.
‘बाणावलीसाठी योजना आखण्याचा हा इशारा’
निसर्गाने गोव्याच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला बाणावलीला वाचवण्यासाठी योजना आखण्याचा सौम्य इशारा दिला आहे, अशी प्रतिक्रिया माजी सरपंच रॉयला फर्नांडिस यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बगलरस्तावर मुंगूल ते बाणावलीदरम्यानच्या सखल भागांत मोठय़ा प्रमाणात पाणी भरून ते रस्त्यावरून वाहू लागल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सर्व भागात पश्चिम बगलरस्त्यावर स्टिल्ट पूल उभारण्याची मागणी येथील रहिवासी करत आले आहेत. राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून पर्यावरण व मानवी जीवन लक्षात घेऊन बाणावलीमध्ये स्टिल्ट्सवरील पूल उभारण्यास महत्त्व देण्याचे आवाहन केले होते. मात्र कायदे करणाऱयांनी आणि न्याय देण्याची जबाबदारी असलेल्यांनी याकडे दुर्लक्ष केले. निसर्गाने त्यांना त्याच्या क्रोधाचा डेमो दाखविला असून मी विनंती करते की, त्यांनी हा इशारा समजून योग्य निर्णय घ्यावा, असे फर्नांडिस यांनी सांगितले.
आकें बायशमध्ये घरांत पाणी शिरण्याचे प्रकार
दरम्यान, मी माझे सहकारी माजी सरपंच रामदास उसगावकर आणि माजी पंच डेनी यांच्यासमवेत आपें बायशमध्ये जेथे घरांमध्ये आणि आजुबाजूच्या परिसरात पाणी साचले आहे त्या भागांना भेट दिली आणि पाहणी केली, अशी माहिती आप युवा गटाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सिद्धेश भगत यांनी दिली. आम्ही आमच्या लोकांना शक्य होईल त्या मार्गाने मदत करण्यास उत्सुक आहोत. बऱयाच वर्षांनी राज्यात एवढा मुसळधार पाऊस पडत आहे. परंतु आमच्या पंचायत मंडळाने गटार व्यवस्थेच्या बाबतीत सातत्याने काम करून घेतले होते. त्यामुळे आज आमचे गाव चांगले स्थितीत आहे. परंतु अशी काही घरे आहेत जी त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे थोडीशी प्रभावित झालेली आहेत आणि आम्ही ते टाळू शकलो नाही. तरीही आम्ही आमच्या लोकांसाठी एक हेल्पलाइन सुरू केली आहे. कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास संबंधितांनी कॉल करून आमच्याशी संपर्क साधावा. आमच्या लोकांच्या सुरक्षेसाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज आहोत, असे भगत यांनी सांगितले.