दिवसभर सर्वत्र जोरदार पाऊस : अनेक ठिकाणी पूरसदृष्य स्थिती,रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली
प्रतिनिधी / पणजी
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार राज्याला सोमवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक सखल भागात पाणी साचले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबण्याचे प्रकार राज्यभर घडले. आज मंगळवारीही गोव्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आले असून आज दिवसभर पाऊस अक्षरशः झोडपून काढण्याची शक्यता आहे.
राजधानी पणजीसह राज्यातील जवळपास सर्वच भागात सकाळपासून पावसाने आपला जोर वाढविला होता. दुपारपासून मुसळधार पाऊस पडला. पणजीतील अनेक भागात या मुसळधार पावसाने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली. पेडणे, म्हापसा, सांखळी व वाळपई केंद्रावर जोरदार पावसाची नोंद झालेली आहे. गोव्यात सर्वाधिक पाऊस पडतोय त्या जुने गोवेमध्ये रविवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस चालू झालेला होता. सोमवारी दिवसभर तसेच रात्री उशिराही जुने गोवे परिसराला पावसाने झोडपून काढले.
जोरदार तथा मुसळधार पाऊस पडणार असा इशारा हवामान खात्याने दिलेला होता. त्यानुसार जोरदार वाऱयासह पडलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. छत्री, रेनकोट इत्यादींचाही फारसा उपयोग झाला नसल्याने कामावर जाऊन सायंकाळी घरी परतणारी अनेक मंडळी भिजून गेली.
पेडणेत 3.5 मि.मि. पाऊस
सोमवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.45 या दरम्यान पेडणेमध्ये सर्वाधिक 3.5 इंच म्हणजेच 9 से.मी. पाऊस झाला. म्हापसामध्ये 2.5 इंच, जुने गोवे येथेही 3.5 इंच, वाळपईत 3 इंच व काणकोणमध्ये 1 इंच एवढी पावसाची नोंद झाली आहे.
आजही रेड अलर्ट
हवामान खात्याने आजही दुसऱया दिवशी गोव्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम गोव्यात तसेच महाराष्ट्रावरही झालेला असून महाराष्ट्रातील अनेक भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झालेली आहे. गोव्यात सोमवारच्या मुसळधार पावसाने देखील हिच स्थिती निर्माण झालेली आहे, मात्र सायंकाळी पावसाचा जोर थोडा कमी झाला. गोव्याच्या ग्रामीण भागात विशेषतः डिचोली, सत्तरी, सांगे व पेडणे तालुक्यात पावसाचा जोर वाढलेलाच होता.
पावसाचा जोर 18 पर्यंत राहाणार!
सायंकाळी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जरी 14 व 15 रोजी रेड अलर्ट जाहीर केलेले असले तरी पावसाचा जोर हा 18 जूनपर्यंत तसाच राहाणार आहे. आज मंगळवारी व उद्या बुधवारीदेखील मुसळधार पाऊस पडेल असे म्हटले आहे.
ओल्ड गोव्यात सर्वाधिक साडेचार इंच पाऊस
सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 8.30 ते सायं 8.30 वाजण्याच्या दरम्यान गोव्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱया ओल्ड गोव्यात साडेचार इंच पावसाची विक्रमी नोंद झाली, तर पणजी आणि पेडणे येथे प्रत्येकी चार इंच पाऊस पडला. वाळपई आणि मुरगाव तसेच म्हापसा येथे प्रत्येकी 3 इंच पावसाची नोंद झाली. त्याचदरम्यान काणकोणमध्ये सुमारे दीड इंच पावसाची नेंद झाली.