कराड शहर व परिसराला झोडपले, कोळे, सुपने, उंडाळे मंडलातही हजेरी
वार्ताहर / कराड
सोमवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने कराड शहर व परिसराला झोडपले. जवळपास दोन तास कोसळलेल्या पावसाने रस्ते जलमय झाले होते. कृष्णा पुलानजीक गटारातील पाणी ओसंडून रस्त्यावरून वाहत होते, तर बसस्थानकाच्या छतावरील पाणी फलाटावर पडत होते.
शनिवारी कराड शहर व तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला होता. तर रविवारी कोळे, उंडाळे व सुपने मंडलात मुसळधार पाऊस झाला. सोमवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास पावसाने शहर व परिसराला झोडपले.
कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने गटरातील पाणी ओसंडून रस्त्यावर वाहत होते. कृष्णा पुलानजीक गटारात कचरा अडकल्याने गटारातील पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून वाट काढावी लागली. आधीच लॉकडाऊन त्यात मुसळधार पाऊस यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. नवीन बसस्थानकाच्या छतावरील पाणी फलाटावर पडत होते. त्यामुळे एसटी प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी छताचे काम करणे गरजेचे आहे.
पावसाळ्याच्या काळात विद्यानगर येथील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचते. वारंवार मागणी करूनही हे काम मार्गी लागले नाही. त्यामुळे यावर्षीही लोकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागणार आहे. याची प्रचिती सोमवारी आली. केवळ दोन तास पडलेल्या पावसाने या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे.
मलकापुरात पावसाचे पाणी घरांमध्ये घुसले
मलकापूर, आगाशिवनगर परिसरातील अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी वेगाने रस्त्यावरून वाहत होते. आगाशिवनगर येथे डोंगरावरून येणारे पाणी गटारे तुंबल्याने थेट नागरिकांच्या घरात घुसल्याने तारांबळ उडाली. मुसळधार पावसाने कराड-ढेबेवाडी रोडसह सेवारस्ताही चार ते पाच ठिकाणी पाण्याखाली गेला होता. झोपडपड्डीतील दोन घरांची किरकोळ पडझड झाली. शास्त्राrनगर येथे रस्त्याकडेला तळमजल्यावरील दुकानगाळ्यांमधेही पाणी शिरले होते.