वेर्णात गाडीवर झाड पडून चालक ठार : अनेक ठिकाणी पडझड, पूर, धरणे तुडुंब
प्रतिनिधी / पणजी
मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले. जोरदार वादळी वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. घरांचीही पडझड झाली. धावत्या गाडीवर झाड पडल्याने त्यातील चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली. अनेक घरात पुराचे पाणी शिरले. अंजुणे धरण तुडुंब भरल्याने धरणाच्या दोन गेट्स खुल्या कराव्या लागल्या. वाळवंटी नदीच्या पाण्याचा स्तर वाढला असून पावसाचा जोर वाढल्यास सांखळीला व आसपासच्या गावांना पुराचा धोका वाढलेला आहे.
मंगळवारी दिवसभर मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पणजीतही पावसाने शतक ठोकले आहे. अनेक भागात पाऊस शतक पार करण्याची शक्यता आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे 24 इंच पाऊस यावर्षी जादा झाला आहे.
वादळी वाऱयामुळे अनेक ठिकाणी पडझड
वादळी वाऱयाचा परिणाम म्हणून राज्यात अनेक झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांच्या छपरावर झाडांच्या फांद्या पडल्या त्यात घरांचे नुकसान झाले तर वेर्णा येथे धावत्या गाडीवर झाड पडल्याने गाडीसह चालकाचाही चेंदामेंदा झाला व चालक जागच्या जागी ठार झाला. राज्यातील धरणेही जोरदार पावसामुळे तुडुंब भरली आहेत. सत्तरीतील अंजुणे धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणाचे चारही दरवाजे खुले करणे भाग पडले. परिणामी सांखळीच्या वाळवंटी नदीच्या पाण्याचा स्तर वाढला व पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली.
वीज, अग्निशामक दलाची उडाली तारांबळ
जोरदार वादळीवाऱयामुळे अनेक ठिकाणी झाले उन्मळून पडली त्यामुळे अग्निशामक दलाच्या सर्वच केंद्रांवर नागरिकांचे फोन खणखणू लागले. अनेक ठिकाणी तात्काळ धावून जवानांनी रस्ते मोकळे केले. वीज खात्याचेही मंगळवारी मुसळधार व वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. पावसात भिजत वीज खात्याचे कर्मचारी सर्वत्र राबत असतानाचे चित्र दृष्टीस पडत होते. अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज खात्याचे कर्मचारी राबत होते.
पणजीत पावसाने केले शतक पार
मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी पणजीने इंचाचे शतक पार केले. सांखळी, पेडणे, जुने गोवे, काणकोण बरोबरच पणजी व केपेने देखील शतक पार केले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे गोव्याची चेरापुंजी ओळखल्या जाणाऱया वाळपईने मात्र अद्याप शतक गाठलेले नाही.
गेल्या 24 तासात राज्यात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे ः पेडणे – 7 इंच, सांगे – 6.5 इंच, केपे – 5.5 इंच, फोंडा – 5 इंच, सांखळी – 5 इंच, वाळपई – 4.5 इंच, दाबोळी – 4.5 इंच, जुने गोवे 4 इंच, काणकोण, मुरगाव, पणजी प्रत्येकी 3 इंच, पणजीत स. 8.30 ते सायं. 5.30 च्या दरम्यान 1 इंच पावसाची नोंद झाली. मौसमात आतापर्यंत 100 इंच पाऊस झालेला आहे व तो सरासरीच्या तुलनेत 24 इंच जास्त आहे.
आणखी जोरदार पाऊस शक्य
पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहिल. मुसळधार व जोरदार वादळी वाऱयासह पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आलेला आहे व मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे कळविण्यात आले आहे.