पूल कोसळल्याने वाहने नदीपात्रात – दरडीही कोसळल्या
ऋषिकेश / वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसादरम्यान येथे पूल कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पावसामुळे पूल खचल्यानंतर अनेक गाडय़ाही वाहून गेल्या आहेत. सध्या या ठिकाणी एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. हवामान विभागाने 5 जिल्हय़ांमध्ये अलर्ट जारी केला आहे. राज्यातील महापूर, दरड कोसळणे आणि पूल खचण्याच्या घटनांमुळे उत्तराखंडमधील नागरिक धास्तावले आहेत.
मुसळधार पावसामुळे देहराडून-ऋषिकेशला जोडणारा पूल खचला. या पुलावरून मोठय़ा प्रमाणात गाडय़ांची वर्दळ असल्यामुळे पूल खचल्यानंतर काही गाडय़ा अडकल्या तर काही पाण्यातून वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेची भीषणता मोठी असली तरी जीवितहानीची अधिकृत माहिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही. मुसळधार पावसामुळे गेल्या 48 तासांत देहराडून येथेही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.