लोकांची उडाली धांदल, पणजीत रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप
प्रतिनिधी/ पणजी
नोव्हेंबरच्या अखेरच्या टप्प्यात राज्यातील जनतेने जूनचे दिवस शनिवारी अनुभवले. शनिवारी दुपारपासून राज्यात विशेषतः पणजी, जुने गोवे, फोंडा इत्यादी परिसरात मुसळधार पाऊस झाला. इफ्फी चालू असून या कार्यक्रमास जाणाऱयांची तर अक्षरशः त्रेधातिरीपट उडाली. राज्यातील जनजीवन शनिवारी कोसळलेल्या पावसामुळे अस्ताव्यस्त झाले. पणजी वेधशाळेने उद्या दि. 22 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
शनिवारी सकाळपासून ढग दाटून आल्याने कोणत्याही क्षणी पाऊस पडणार अशीच चिन्हे होती. दुपारी पावणे दोनच्या सुमारास पणजीत पावसाला प्रारंभ झाला व रात्री उशिरापर्यंत पणजीत जोरदार पाऊस पडत होता. फोंडामध्ये देखील सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. जुने गोवे येथे सुमारे पावणे दोन इंच पावसाची नोंद आहे. तर पणजीत सायं. 5.30 दीड इंच पावसाची नोंद झाली. पणजीत दुपारपासून पाऊस सुरु झाल्याने शनिवारी नागरिकांची एकच धांदल उडाली. राजधानी पणजीत शनिवारी इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला आणि या कार्यक्रमाला देशाच्या विविध भागातून माणसे उपस्थित होती. मुसळधार पावसाने सर्वांचीच धांदल उडाली. अनेकजण भिजून गेले तर इफ्फी उत्सवानिमित्त राजधानी पणजीत शहरातील सजावट भिजून गेली.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम म्हणून दुपारी मुसळधार पावसाला प्रारंभ झाला व रात्री उशिरापर्यंत हा पाऊस चालूच होता. पणजीत सायं. 5.30 पर्यंत दीड इंच, जुने गोवेत सर्वाधिक पावणेदोन इंच, काणकोणमध्ये अर्धा इंच, वाळपईत 1 से.मी. एवढा पाऊस झाला. या पावसामुळे अनेकजण अडकून पडले. पाऊस पडणार असे भाकीत कोणीही गंभीरपणे घेतले नव्हते. परिणामी रेनकोट, छत्र्या हाती नसलेले मंडळी विविध ठिकाणी अडकून पडली. हा पाऊस एवढय़ा जोरात पडत होता की, पणजी पुन्हा बुडतेय की काय? अशी स्थिती निर्माण झाली. जनतेने नोव्हेंबरमध्ये जूनच्या पावसाचा अनुभव घेतला.