48 तासांसाठी रेड अलर्ट जारी
प्रतिनिधी/ पणजी
आक्रमक मान्सूनने संपूर्ण गोवा राज्याला रविवार सायंकाळपासून सोमवार सायंकाळपर्यंत अक्षरश: झोडपून काढले. राज्यातील सर्व नद्या नाल्यांना पूर आलेला असून सर्वच धरणांमधून मोठय़ाप्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने आसपासच्या गावाना धोका निर्माण झाला. डिचोली, सांखळी, काणकोण, केपे, सांगेसह अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पारोडा, काणकोण, सांखळी, डिचोली येथील नद्यांना पूर आला आहे. हवामान खात्याने आणखी 48 तास मुसळधार पाऊस कोसळण्याची भिती व्यक्त करून रेड अलर्ट जाहीर केला आहे. जोरदार वादळी वाऱयासह पावसाचा इशारा दिलेला आहे.
राज्यातील मुसळधार पावसाने अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक वृक्ष कोसळले. पारोडा-केपे येथील बांध फुटल्याने सर्वत्र पाणीपाणीच झाले आहे. साळावलीचे 30 एमएलडी जलवाहिनीतून वेळ्ळी व झुवारीनगरपर्यंत जाणारा कच्च्या पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला. तिळारीतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने साळ व आसपासच्या भागात सावधानतेचा इशारा दिला आहे.
मुसळधार पावसाने संपूर्ण राज्याला झोडपले
राज्यात मान्सुनने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. गुरुवारी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र शुक्रवार व शनिवारी मर्यादितच पाऊस झाला. रविवारी सर्वत्र जोरदार पाऊस झाला व रात्री उशिरा सुरु झालेला पाऊस सोमवारी सायंकाळपर्यंत अखंड चालूच राहिला. रात्रभर पावसाने राज्याला झोडपून काढले. सोमवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. संपूर्ण गोव्यालाच पावसाने झोडपले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले. पारोडा-केपे येथे जलप्रलयाने मडगाव-केपे रस्त्यावरील वाहतुकच ठप्प झाली.
गव्या रेडय़ाचा मृत्यू, वाहनेही वाहून गेली
सत्तरीत म्हाऊस येथे म्हादई नदीतून गवा रेडा वाहून झाडांमध्ये अडकला खरा, परंतु पोटात पाणी गेल्याने गुदमरून तो मरण पावला. काही गावांमध्ये पुराच्या पाण्यात वाहने वाहून गेल्याचे वृत्त आहे. सांखळीच्या वाळवंटी नदीतही पूर आला. त्यातच धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने वाळवंटीतील पाण्याची पातळी दुपारी 3.85 मीटर एवढी राहिली. जलस्रोत खात्याने सांखळी बाजारातून पंप हाऊस चालू करून तेथून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग केल्याने सांखळीत पुराचा धोका टळला. मात्र वाळवंटीचा जलस्तर तसाच राहिला.
संपूर्ण राज्यात रेड अलर्ट जारी
सोमवारी रात्री उशिरा पावसाचा जोर कमी झाला नव्हता. हवामान खात्याने राज्यात रेड अलर्ट जारी केले आहे. आज व उद्या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सायंकाळी जारी केलेल्या पत्रकात मध्यम तथा अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्र खवळलेला राहील आणि लाटांची उंचीही वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. वादळी वाऱयाचा वेगही वाढला जाऊ शकतो. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.
सांगेत 7 इंच, फोंडा व सांखळीत 5 इंच
रात्रभर कोसळलेल्या पावसाने सांगे, फोंडा, सांखळी व केपे आणि वाळपईला झोडपून काढले. सांगेमध्ये 7 इंचपेक्षाही जास्त पाऊस पडला. सांखळी, फोंडा, वाळपई, केपे येथे प्रत्येकी जवळपास 5 इंच, मडगाव 3.5 इंच, पेडणे, काणकोण येथे प्रत्येकी 3 इंच, जुने गोवे येथेही जवळपास 3 इंच आणि दाबोळी येथे 2.5 इंच, म्हापसा, पणजी व मडगाव येथे प्रत्येकी 1 इंच एवढी पावसाची नोंद झाली. पणजीत सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान 3 सेंमी एवढी पावसाची नोंद झाली.
यंदा वार्षिक सरासरीपेक्षा 40 इंच जादा पाऊस राज्यात पडत असलेल्या पावसाने अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आतापर्यंत यंदाच्या मोसमात हा 40 इंच जादा पाऊस झालेला आहे. गेल्या 24 तासात राज्यात सरासरी 3.50 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात 4059 मिमी तर दक्षिण गोव्यात 3753 मिमी अशी पावसाची नोंद यंदा झाली. सरासरी ती 2892 असते. त्या ऐवजी यंदा 3898 एवढा पाऊस झालेला आहे. यंदा राज्यात आजच्या दिवसापर्यंत 154 इंच एवढा पाऊस नोंदविला गेला. पेडणेची वाटचाल सध्या इंचांच्या द्विशतकाच्या दिशेने चालू झाली आहे.