तीन जणांना अटक. गोप्रमींच्या माहितीवरून डिचोली पोलिसांची कारवाई. गोमांसाची विल्हेवाट. बेळगावहून बेकायदेशीररीत्या गोव्यात येते गोमांस.
प्रतिनिधी / डिचोली
मुस्लीमवाडा व नागझर डिचोली येथे बेकायदेशीर व आरोग्यास अपायकारक असे गोमांस विक्री केंद्रावर डिचोली पोलिसांनी कारवाई करीत तीन जणांना अटक केली. तसेच सदर सर्व गोमांसाची डिचोली नगरपालिकेच्या सहाय्याने विल्हेवाट लावली. गोप्रेमींना दिलेल्या माहितीनुसार सदर कारवाई करण्यात आली असून मुस्लीमवाडा येथील सदर दुकानाला अधिकृत विक्री परवाना नसल्याने ते दुकान सील करण्यात आले आहे.
मुस्लीमवाडा डिचोली येथे मसजिदजवळ नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या एका दुकानात कार रवि. दि. 26 जुलै रोजी सकाळी गोमांस विक्रीची तयारी सुरू होती. सदर माहिती गोप्रेमींना मिळताच त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश केणी यांना माहिती दिली. त्यांनी सदर प्रकरणाची माहिती डिचोली पोलिसांना दिल्यानंतर डिचोली पोलीस निरिक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर रामानंद व इतरांनी मुस्लीमवाडा येथे सदर नदीन महम्मद बशीर शेख व शागीर नझीर शेख यांच्या दुकानावर धाड घातली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश केणी हेही उपस्थित होते.
बेळगावहून आलेले गोमांस अनधिकृत व अनारोग्यकारक
सदर धाडीत दुकानामध्ये सुमारे 150 किलो गोमांस असल्याचे आढळून आले. सदर मांस हे अनारोग्यकारक असल्याचे डॉ. केणी यांनी नमूद केले. तसेच ते बेळगावहून गोव्यात आल्याची माहिती दुकानमालकाकडून देण्यात आली. सदर मांंस वाहतूकीची कागदपत्रे व मांसाच्या कार्यक्षमतेबाबतच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असता सदर कागदपत्रे बनावट व अनधिकृत असल्याचे दिसून आले. सदर मांस हे अनधिकृत कत्तल खान्यातून पाठविण्यात आले असून सदर कत्तलखान्यातून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर नोंदणी क्रमांक नाही, पत्ता नाही. केवळ एक स्टेंप होता. त्यामुळे सदर मांस हे अनधिकृत कत्तल खान्यातून बेकायदेशीररीत्या व अनारोग्यकारक पध्दतीने गोव्यात आणण्यात आल्याचे सिध्द झाल्यानंतर ते जप्त करण्यात आले.
दुकानाला गोमांस विक्री परवाना नसल्याने दुकान सील.
मुस्लीमवाडा डिचोली येथे कारवाई करण्यात आलेल्या नझीन महम्मद बशीर शेख व शागीर नझीर शेख यांनी नवीनच दुकान खोलले होते. व काल रविवारी त्यांचा दुकान उघडण्याचा पहिलाच दिवस होता. मात्र त्यांच्याकडे सदर दुकानात नगरपालिकेतर्फे आवश्यक असलेला गोमांस विक्री परवाना नव्हता. असे चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे सदर धाडीनंतर सदर दुकान सील करण्यात आले. सदर धाड प्रकरणी कोणीतरी आपल्यावर व्यवसायिक वैरत्व काढल्याचे यावेळी नदीन यांनी सांगितले. त्यामुळे तक्रार करणाऱया दुसऱया एका याच व्यवसायातील व्यवसायिकाची नदीन व शागीर यांनी तक्रार केल्यानंतर तेथेही धाड मारून गोमांस जप्त करण्यात आले.
नागझरवाडा येथेही गोमांस विक्री केंद्रावर धाड व मांस जप्त.
मुस्लीमवाडा येथील नदीन व शगीर शेख यांच्या दुकानावर पोलीस व पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी धाड मारल्यानंतर सदर दुकानदारांनी नागझरवाडा डिचोली येथील अब्दुल बेपारी यांच्या दुकानातही बेकायदा व अनारोग्यकारक गोमांस विक्री होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर पोलीस निरिक्षक संजय दळवी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश केणी यांनी नागझरवाडा येथील बेपारी यांच्या दुकानावर धाड मारली. तेथेही त्यांना बेकायदेशीर वाहतूक करून आणलेले व अनारोग्यकारक गोमांस आढळून आले. तसेच सदर मासही अनधिकृत कत्तल खान्यातून आणण्यात आल्याचे आढळून आल्यानंतर तेही गोमांस जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
तीन जणांना अटक
या प्रकरणी मुस्लीमवाडा डिचोली येथील नदीन महम्मद बशीर शेख व शागीर नझीर शेख यांना डिचोली पोलिसांनी अटक केली. तसेच नागझरवाडा येथील गोमांस विक्री केंद्राचे मालक अब्दुल बेपारी यांनाही अटक करण्यात आली. बेकायदेशीर गोमांस आणून ते अनारोग्यकारक स्थितीत असतानाही विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा ठपक त्यांच्यावर लावण्यात आला आहे. तर नदीन व शागीर यांच्यावर विक्री परवाना नसताना बेकायदेशीर गोमांस विक्री करण्याचा प्रयत्न. तसेच अनारोग्यकारक गोमांस बेकायदेशीररीत्या आणून त्याची विक्री करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
(ँर्दे) बेळगावातून दररोज अवैध गोमांसाची वाहतूक. शासकीय यंत्रणेच्या डोळय़ावर पट्टी ?
गोवा राज्यात गोमांस पुरविण्याची परवानगी केवळ उसगावातील गोवा मांस प्रकल्पाला आहे. तसेच तेथेच सर्व सोपस्कार पूर्ण करून कत्तलीसाठी योग्य असलेल्या गुरांची कत्तल करण्याचा परवाना. आहे मात्र सध्या सदर मांस प्रकल्प कायद्याच्या कचाटय़ात सापडल्याने तेथील गोहत्या बंदच आहेत. तरीही गोव्यात दरदिवशी बेळगावहून हजारो टन गोमांस आयात होते. बेळगावात चालणाऱया बऱयाच प्रमाणातील अनधिकृत कत्तल खान्यांमधून बेकायदेशीर गोहत्या करून ते मांस बनावट पशुवैद्यकांच्या बनावट प्रमाणपत्रावर गोव्यात पाठविले जाते. या बाबीची सर्व शासकीय यंत्रणांना कल्पनाही आहे. तरीही शासनाच्या संबंधित यंत्रणांच्या डोळय़ावर पट्टी बांधल्याप्रमाणे सदर मासांचे राजरोसपणे गोव्यात वाहतूक व जोरदार विक्रीही चालते. हे काल डिचोलीतील प्रकरणावरून सिध्द झाले आहे. गोव्यात दरदिवशी उत्तर गोव्यात 10 टन व दक्षिण गोव्यात 10 टन असे गोमांस भरून गाडय़ा दाखल होतात. त्यांच्याकडील कागदपत्रांची योग्य पडताळणी न होताच त्यांना थेट गोव्याची सीमा खुली करून दिली जाते. काल मुस्लीमवाडा येथील धाडीवेळी या सर्व गोष्टी उघड झाल्या. राज्यात शासनाचे अशा प्रकारच्या अवैध गोष्टींवर योग्य लक्ष व नियंत्रण नसल्यानेच या गोष्टी सर्रासपणे घडत असल्याचे दिसून येत आहे.