मालाबार भागातील 6 जिल्हय़ांमध्ये 60 मतदारसंघ, मालाबार भागावर वर्चस्व ठेवणाऱया पक्षाचेच राज्यात येते सरकार
मालाबार हा भाग केरळच्या राजकारणाचे द्वार आहे. केरळचे 6 जिल्हे या भागात मोडतात, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड यांचा यात समावेश आहे. या 6 जिल्हय़ांमध्ये केरळमधील 60 मतदारसंघ असून या भागात वर्चस्व ठेवणारा पक्षच राज्यात सरकार स्थापन करण्यास यशस्वी होत असतो.
या पूर्ण भागाला इंडियन युनायटेड मुस्लीम लीगचा (आययुएमएल) बालेकिल्ला आणि डाव्या पक्षांचा हार्ट लँडही म्हटले जाते. मुस्लीम लीग काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफमध्ये सामील आहे. तर माकप एलडीएफचे नेतृत्व करत आहे. या भागात काँग्रेसकडून अद्याप राहुल गांधींची प्रतीक्षा केली जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन केरळची सुरुवात याच भागातील पलक्कडमध्ये सभा घेत केली होती. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनीही कन्नूरमध्ये रोड शो केला आहे. तर माकप नेते आणि मुख्यमंत्री पी. विजयन याच भागातील धर्मदम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
मुस्लीम लीगचे महासचिव कुन्हाली कुट्टी हे मलप्पुरमच्या वेंगरा मतदारसंघात उभे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन हे कासरगोडच्या मंजेश्वर मतदारसंघातून तर मेट्रोमॅन ई. श्रीधरन पलक्कडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
मागील निवडणुकीत मालबारमध्ये युडीएफचे अस्तित्व मुस्लीम लीगनेच वाचविले होते. मलप्पुरम आणि कोझिकोड येथे मुस्लीम लीगचे वर्चस्व आहे. 2016 मध्ये एलडीएफने मालाबार क्षेत्रातील 60 पैकी 37 जागांवर विजय मिळविला होता. तर युडीएफला 23 जागांवर यश मिळाले होते. यातील 17 जागा मुस्लीम लीगने जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ 6 जागांवर यश मिळविता आले होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस येथे मोठा पाठिंबा मिळाला होता. या भागातील सर्व 9 लोकसभा मतदारसंघांमध्ये युडीएफने विजय मिळविला होता. विधानसभा मतदारसंघांच्या दृष्टीने पाहिले गेल्यास राज्यातील 140 जागांपैकी केवळ 16 मतदारसंघांमध्ये एलडीएफ आघाडीवर होते, यातील 11 मतदारसंघ मालाबार क्षेत्रातील होते.
यंदा युडीएफ या भागात चांगल्या स्थितीत दिसून येत आहे. युडीएफला येथे 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला मंजेश्वर या मतदारसंघात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. 2016 च्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार केवळ 86 मतांनी पराभूत झाला होता. मालाबार भागात भाजपला 4 जागांवर यश मिळण्याचा अनुमान आहे.
मलप्पुरम, कोझिकोड आणि कासरगोड या तिन्ही जिल्हय़ांमध्ये लक्षणीय मुस्लीम लोकसंख्या आहे. मलप्पुरम जिल्हय़ात 70 टक्के मतदार मुस्लीम आहेत. तर केरळच्या या जिल्हय़ात सर्वाधिक 16 विधानसभा मतदारसंघ आहेत. मागील निवडणुकीत एलडीएफची लाट असतानाही युडीएफला येथे 12 जागांवर यश मिळाले होते. या सर्व जागा मुस्लीम लीगनेच जिंकल्या होत्या. कोझिकोडमध्ये सुमारे 40 टक्के मतदार मुस्लीम आहेत. येथे एकूण 13 मतदारसंघ असून बहुतांश ठिकाणी मुस्लीम लीगच विजयी होत राहिला आहे. कासरगोडमध्ये सुमारे 38 टक्के मुस्लीम मतदार आहेत.