सांगली/प्रतिनिधी
मुकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्याआरोपीस 20 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सांगली येथील विशेष सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी शुक्रवारी सुनावली. आरोपी बलरामकुमार रामविलास गौतम (वय-२७ वर्षे) रा. विमल सिमेंट पाईप कंपनी, एम. आय. डी. सी. मिरज मुळ रा. डुमरीयागंज, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश यास भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२) (एल) (एन) व पोक्सो कायद्याचे कलम ६ अन्वये दोषी धरून ही कारावासाची शिक्षा व रक्कम रुपये २५ हजार दंड, दंड न भरलेस आणखी एक वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. याकामी सरकारपक्षातर्फे अति सरकारी वकिल श्रीमती आरती देशपांडे (साटविलकर) यांनी काम पाहिले.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी यांची मुलगी मुकबधीर असून ते सन २०१८ मध्ये त्यांच्या कुटूंबासह कुपवाड एम. आय. डी. सी. मधील विमल सिमेंट पाईप कंपनीत कामास होते. त्यावेळी आरोपी हा सुध्दा त्या कंपनीत कामास होता. फिर्यादी व त्यांची पत्नी हे कंपनीत कामात व्यस्त असताना आरोपीला मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील तिला अमिष दाखवून आरोपीने तिच्यावर अत्याचार केले व तिला दोन महिन्याची गरोदर होण्यास भाग पाडले. फिर्यादीस या घटनेची माहिती समजताच त्यांनी पोलिसात धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता.