आईनेच कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न
प्रतिनिधी / सांगली
संजयनगरच्या दडगे प्लॉटमधील दोन वर्षांच्या मूकबधीर बालिकेचा खून तिच्याच आईने गळा दाबून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मूकबधीर असल्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली असून या बालिकेची आई सौ. रेवती संजय लोकरे (वय 25) हिला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी ही बालिका एकटीच खेळत असताना अचानक बेशुद्ध पडल्याचा दावा करत आईने उपचारासाठी वसंतदादा रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये बालिकेच्या गळ्यावर व्रण दिसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आईला कशी घटना घडली याची माहिती विचारली असता ती दबकून उलटसुलट उत्तरे देवू लागली. त्यामुळे पोलिसांना तिचा संशय आला.
या बालिकेचे वडिल संजय पुणे येथे असतात. सांगलीत त्यांची पत्नी रेवती आणि मुलगी ज्ञानदा राहतात. रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ज्ञानदा घरात एकटीच खेळत होती. नंतर आपण घरात गेलो असता ज्ञानदा ही निपचीप म्हणजे बेशुद्धच पडली होती, असे तिच्या आईने सांगितले होते. सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूचे कारण खून केल्याचे समारे आले. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.
पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे रेवतीने आपणच मुलीचा खून केल्याची कबुली दिली. ही मुलगी मूकबधीर असल्याने हा खून केल्याचे तिने सांगितले. तपास सहाय्यक काकासाहेब पाटील करत आहेत.