शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बलिदान मासची ध्येयमंत्राने सांगता
प्रतिनिधी /बेळगाव
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्माभिमान जागृत ठेवत बलिदान दिले. परंतु त्यांच्या नशिबी शेवटची अंत्ययात्रा आली नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शुक्रवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने शहरातून मूक पदयात्रा काढून धर्मवीर ज्वाला विधिवतपणे शांत करण्यात आली. या मूक पदयात्रेमध्ये शेकडोच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते.
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या दरम्यान महिनाभर बलिदान मास पाळला जातो. औरंगजेबने फंदफितुरी करत संभाजी महाराजांना कैद केले. औरंगजेबविरोधात लढण्यासाठी कोणताही मराठा सरदार पुढे येवू नये, यासाठी संभाजी महाराजांचे एक एक अवयव काढत त्यांना मरण यातना देण्यात आल्या. अखेर हाल करत त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचे बलिदान हिंदू समाजाला स्मरणात रहावे, यासाठी बलिदान मास पाळला जातो.
संभाजी महाराजांच्या नशिबी अंत्ययात्रा आली नसल्याने शिवप्रतिष्ठानच्यावतीने शुक्रवारी मूक पदयात्रा काढत महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यान येथून पदयात्रेला सुरुवात झाली. एसपीएम रोड, शनिमंदिर, हेमू कालानी चौक, टिळक चौक येथून रामलिंगखिंड गल्लीमार्गे धर्मवीर संभाजी चौकात सांगता झाली. संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. बुडा चेअरमन संजय बेळगावकर व शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता रचून त्यांना मंत्राग्नी देऊन दहन करण्यात आले. छत्रे गुरुजींनी पौरोहित्य केले.
संभाजी महाराजांच्या सांगली येथील वढू बुद्रुक या समाधीस्थळापासून आणलेल्या ज्वालेचे युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. जिल्हाप्रमुख किरण गावडे व कणबर्गी विभाग प्रमुख हिरामणी मुचंडीकर यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले. गजानन निलजकर यांनी भारतमातेची प्रतिज्ञा दिली. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावषी तब्बल 110 विभागांमध्ये ज्वाला देण्यात आली. बेळगाव, खानापूर यासह गोवा, सिंधुदुर्ग येथेही ज्वाला पोहोचली. यावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, अजित जाधव, पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, किरण बडवाण्णाचे, अंकुश केसरकर, अतुल केसरकर, प्रमोद चौगुले, चंद्रशेखर चौगुले, उदीत रेगे, अभिजीत अष्टेकर यांसह मोठय़ा संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
वडगावमध्येही मूक पदयात्रा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बेळगाव शहरासह वडगाव विभागात भव्य मूक पदयात्रा शुक्रवारी सायंकाळी काढण्यात आली. विष्णू गल्ली येथून या पदयात्रेला प्रारंभ झाला. यरमाळ रोड, पाटील गल्ली, येळ्ळूर रोड, कारभार गल्ली, राजवाडा कंपाऊंड, नाझर कॅम्प, वडगाव मेन रोड, रामदेव गल्ली, सोनार गल्ली, बाझार गल्ली, रयत गल्ली, धामणे रोड, तेग्गीन गल्ली, कोरवी गल्ली, कुलकर्णी गल्ली, कलमेश्वर रोड, चावडी गल्ली, वझे गल्ली येथून पुन्हा विष्णू गल्ली येथे पदयात्रा दाखल होऊन सांगता झाली.