प्रतिनिधी / कुरुंदवाड
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू असले तरी हा लॉकडाऊन वेळ वाया जाऊ नये या उद्देशाने नृसिंहवाडी ता. शिरोळ येथील गणेश मूर्तिकार व श्री दत्त देव संस्थानचे विश्वस्त रामकृष्ण पुजारी हे शाडूच्या घरगुती पूजेच्या गणेश मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुजारी यांचे घरी शाडूच्या पर्यावरण पूरक गणेशमूर्ती करण्याची परंपरा आहे. या घराण्याची ही तिसरी पिढी कार्यरत आहे. या पुजारी घराण्यातील दुसऱ्या पिढीचे मुर्तीकर रामकृष्ण पुजारी हे साधारणत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शाडूच्या गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ करतात. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट आले आहे यातून गणरायाच सर्वांना तारेल अशी त्यांची भावना आहे.
नेहमीप्रमाणे यावर्षीही त्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल, शाडु, रंग, साहित्य, काथ्या इत्यादी साहित्य खरेदी केले होते. त्यामुळे या संकटातही त्यांनी आपले मूर्ती तयार करण्याचे काम गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केले आहे.
घरगुती पूजेसाठी लागणारी बैठी गणेश मुर्ती तयार करण्याची त्यांची खासियत आहे. शेती कामे दत्त मंदिरातील नित्यसेवा आणि अन्य कामामधून मूर्ती तयार करण्यासाठी ते रोज तीन ते चार तास वेळ काढतात. दरवर्षीप्रमाणे त्यांनी याहीवर्षी 250च्या आसपास छोट्या घरगुती पूजेसाठी लागणाऱ्या गणेशमूर्ती तयार करण्याचा संकल्प केला असून त्यादृष्टीने त्यांचे काम सुरू आहे.
महापुरातील नुकसानीची अध्याप भरपाई नाही… !
आमचे वडील विष्णुपंत पुजारी यांच्याकडून आपण मूर्ती तयार करायला शिकलो त्यांच्या पश्चात ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामध्ये 50 पोती पीओपी, 18 पोती शाडू तसेच150च्या आसपास लहान शाडूच्या मुर्त्या, 15 प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या मूर्त्या रंग, साहित्य अन्य कच्चामाल मोटर दुरुस्ती यांचे अतोनात नुकसान होऊन 1 लाखाच्या आसपास आर्थिक फटका बसला. याबाबत पूरग्रस्त सूक्ष्म व लघु उद्योग विभागाने सर्वेक्षण करून पंचनामा केला आहे. याबाबत वारंवार तहसीलदार जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून देखील एक रुपया देखील नुकसान भरपाई मिळाली नाही. पुन्हा संभाव्य पूर येण्याची वेळ आली आहे तरी शासनाने माझ्या व्यवसायाच्या नुकसानीची भरपाई द्यावी.