ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अभ्यासक्रम कमी करणे आणि मूलभूत शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ची रचना करण्यात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत एकविसाव्या शतकातील शालेय शिक्षण परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेला संबोधित केले.
मोदी म्हणाले, एकविसाव्या शतकातील कौशल्याने आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना घडवावे लागेल. क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, को-ऑपरेशन, क्युरोसिटी आणि कम्युनिकेशन या गोष्टी महत्वाच्या असतील. अभ्यासक्रम कमी करणे आणि मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एनईपीची रचना करण्यात आली आहे. शिकण्यासाठी एकात्मिक आणि आंतरविद्याशाखीय, मौजमजेवर आधारित आणि संपूर्ण अनुभव देण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रमाची चौकट विकसित केली जाणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता विकसित करणे हे राष्ट्रीय ध्येय म्हणून स्वीकारले जाईल. जेव्हा शिक्षणाचा परिसराशी संबंध जोडला जातो, तेव्हा त्याचा विद्यार्थ्याच्या संपूर्ण जीवनावर, संपूर्ण समाजाच्या संपूर्ण जीवनावरही परिणाम होतो.
आपल्या देशभरातील प्रत्येक प्रदेशाची स्वत:ची गुणवत्ता असते. काही पारंपरिक कला, कामगार, उत्पादने सर्वत्र प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी त्या लूम्सला, हँडलूमला भेट देतात, हे कपडे कसे बनवले जातात ते पाहतात, अशा कुशल लोकांना शाळेतही प्रशिक्षक म्हणून बोलावले जाऊ शकते, असेही मोदी म्हणाले.