मोठमोठय़ा टाक्यांमध्ये पडून आहेत मृतदेह
जीवन आणि मृत्यू याचा निर्णय भगवंताच्या हातात असल्याचे बोलले जाते. दैव बलवत्तर असेल तर एखाद्या मोठय़ा दुर्घटनेतूनही एखादा वाचतो, नाही तर अनेकदा झोपेतही माणसाचा मृत्यू ओढवण्याचे प्रकार घडतात. परंतु माणूस नेहमीच निसर्गाशी स्पर्धा करत राहिला आहे. याचा फटका देखील त्याला बसला आहे. आता अमेरिकेतील एका अशा प्रयोगशाळेचे चित्र समोर आले आहे, ज्यात मृतदेह जिवंत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते.
वैद्यकीय जगताने काळासोबत मोठी प्रगती केली आहे. परंतु आता या सर्व तंत्रज्ञानांना मागे सोडणारा एक प्रयोग चर्चेत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे मृत्युमुखी पडलेले लोक परत जिवंत करता येणार आहेत.
अमेरिकेत सुरू प्रयोग
अमेरिकेत या तंत्रज्ञानाला क्रायोनिक्स म्हटले जाते. ऍरिझोनामध्ये निर्माण एका प्रयोगशाळेत या तंत्रज्ञानाद्वारे जिवंत होण्याच्या अपेक्षेत अनेक मृतदेहांचा संग्रह करून ठेवण्यात आला आहे. यात अनेक श्रीमंत लोक सामील असून त्यांनी स्वतःच्या मृत्यूपूर्वी पुन्हा जिवंत होण्याच्या अपेक्षेने स्वतःचा मृतदेह प्रयोगशाळेच्या स्वाधीन करून ठेवण्याची सोय केली होती. याच्या बदल्यात प्रयोगशाळेत मृत्युमुखी पडण्यापूर्वी त्यांनी चांगला निधी दिला होत. या लोकांना पुन्हा जिवंत होण्याची अपेक्षा होती. याचमुळे त्यांनी स्वतःचा मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयोगशाळेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला होता.
तंत्रज्ञानाचे स्वरुप क्रायोनिक्समध्ये मृतदेह अत्यंत कमी तापमानात ठेवण्यात येतो. यात मृत्यू झाल्याच्या कित्येक वर्षांनंतरही मृतदेहाला कुठलेच नुकसान होत नसते. अशा स्थितीत भविष्यात जिवंत करणारे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास या मृतदेहांना पुन्हा जिवंत करता येणार आहे. याच अपेक्षेत हे मृतदेह जतन करून ठेवले जात आहेत. 100 वर्षांपूर्वी चंद्रावर जाणे अशक्य वाटत होते. परंतु सध्या हे सहज शक्य आहे. अशा स्थितीत एखादे तंत्रज्ञान मृताला जिवंत करू शकेल ही अपेक्षा करणे गैर नव्हे.