कोरोनाचे एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. 62 वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यावर ऑटोप्सी करण्यात आली असता फुफ्फुसे लेदरबॉलप्रमाणे कठोर झाली असल्याचे आढळून आले आहे. रुग्णाच्या मृत्यूच्या 18 तासांनंतरही त्याच्या नाक, गळय़ातील स्वॅब नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू जिवंत आढळला आहे.
फुफ्फुसांमध्ये एअर सॅक पूर्णपणे खराब झाले हेते. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळय़ा तयार झाल्या होत्या, अशी माहिती ऑटोप्सी करणाऱया ऑक्सफोर्ड मेडिकल कॉलेजचे डॉ. दिनेश राव यांनी दिली आहे.
1.10 तासांमध्ये पूर्ण झाली ऑटोप्सी
कोरोनाबाधितांची ऑटोप्सी करण्यात आल्याने आजार किती प्रमाणात वाढत होता हे समजते. संबंधित रुग्णाच्या ऑटोप्सीत एक तास 10 मिनिटांचा वेळ लागला आहे. ऑटोप्सीचा अंतिम अहवाल बुधवारी प्राप्त होणार असल्याचे डॉ राव यांनी सांगितले आहे. फुफ्फुसे, नाक, गळा, तोंड आणि त्वचेतून 5 स्वॅब नमुने घेण्यात आले. नाक आणि गळय़ातून घेण्यात आलेल्या नमुन्यांची आरटी-पीसीआर चाचणी करविण्यात आली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातून रुग्णाच्या मृत्यूनंतरही संक्रमण फैलावण्याचा धोका असतो असे सिद्ध झाल्याचे डॉ. राव म्हणाले.
भारतात वेगळय़ा प्रकारचा स्ट्रेन
ऑटोप्सी संबंधिताच्या कुटुंबीयांच्या मंजुरीनेच झाली होती. रुग्णाचे कुटुंब गृहविलगीकरणात होते. ऑटोप्सीत आढळून आलेली बाब अमेरिका आणि इटलीतही दिसून आली आहे. विषाणूचा जो स्ट्रेन भारतात संक्रमण फैलावत आहे, तो वेगळय़ा प्रकारचा असल्याचे यातून समोर आल्याचे डॉक्टर राव म्हणाले.