प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी काम करणाऱया सरकारी कर्मचाऱयांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास 30 लाखांचा विमा देण्याची घोषणा राज्य सरकारने यापूर्वी केली होती. मंगळवारी सरकारने कोरोनाने मृत्यू झालेल्या कोरोना योद्धय़ांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम मंजूर करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कोरोना योद्धय़ांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
कर्नाटक पंचायतराज आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा पंचायतींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना पत्र पाठविले आहे. कोरोना नियंत्रणाच्या कामात गुंतल्यानंतर संसर्ग होऊन मृत्यू होणाऱया सरकारी कर्मचाऱयांच्या कुटुंबाला संसर्गजन्य रोग नियंत्रण कायद्यानुसार विम्याची रक्कम द्यावी. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी आणि टीएचओ, तालुका पातळीवर तहसिलदार आणि कोविड नोडल अधिकाऱयांकडून प्रमाणपत्र घेऊन संबंधित खात्याच्या कार्यालयाच्या खर्चातून विम्याची रक्कम द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे.
जि., ता. पं.च्या अनुदानातून रक्कम द्या
एखाद्या वेळेस संबंधित खात्याच्या अनुदान नसल्यास आणि कोविड नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियुक्त झालेल्या कर्मचाऱयाचा कोरोनाने बळी गेल्यास जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या अनुदानातून ही रक्कम द्यावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.