उचगाव / वार्ताहर
अमोल चंद्रकांत शिर्के या गवंडीकाम करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वळीवडे ता. करवीर येथील डॉक्टर समीर वाडीलाल शहा यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ दलित महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास आज गुरुवार पासून प्रारंभ झाला.
डॉ. समीर वाडीलाल शहा वैशाली क्लीनिक, राधास्वामी बस स्टॉप शेजारी, वळीवडे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना अंधारात ठेवून कोरोना असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले. या सदोष व हलगर्जीपणे केलेल्या उपचारांमुळे अमोल शिर्के याचा मृत्यू झाला. पाच दिवसांच्या उपचारानंतर शिर्के याला डॉ शहा सीपीआर रुग्णालयात स्वतःच्या कारमधून घेऊन गेले. तेथे रुग्णाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. तेथे उपचारापूर्वीच शिर्के याचा मृत्यू झाला. असे होऊनही प्रशासनाने संबंधित डॉक्टर वर कायदेशीर कारवाई केली नसल्याने दलित महासंघाचे गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे, महेश कांबळे, वीरेंद्र भोपळे, रामभाऊ साळुंखे, महेश माळी, सचिन शिर्के, मृत अमोल शिर्के यांची पत्नी व दोन मुले बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाली. जोपर्यंत डॉक्टर वर कारवाई होणार नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.