ऑस्ट्रेलियन जलतरणपटूचा भीमपराक्रम, 4 सुवर्ण व 3 कांस्यपदकांचा समावेश
ऑस्ट्रेलियाच्या इम्मा मॅकॉनने एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी पहिली महिला जलतरणपटू बनण्याचा विक्रम प्रस्थापित केला. रविवारी तिने 50 मीटर्स फ्री स्टाईल व त्यानंतर महिलांच्या 4ƒ100 मेडले रिलेत सुवर्णपदकाची कमाई करत या पराक्रमावर शिक्कामोर्तब केले. मॅकॉनने यंदा टोकियोत याआधी महिला 100 मीटर्स फ्री स्टाईल, 4ƒ100 फ्री स्टाईल रिलेमध्ये सुवर्ण, 4ƒ100 मी. मिक्स मिडले रिले, 100 मीटर्स बटरफ्लाय व 4ƒ200 फ्री स्टाईल रिलेमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.
पुरुषांच्या गटात अमेरिकेच्या कॅलेब ड्रेसेलने स्प्रिन्ट इव्हेंट्समध्ये दबदबा कायम राखताना 50 मीटर्समध्ये देखील विजय प्राप्त केला. यापूर्वी त्याने 100 मीटर्स जलतरणातही वरचष्मा गाजवला होता. पुरुषांच्या मेडले रिलेत अमेरिकेने सुवर्ण जिंकले. रॉबर्ट फिंकेने 800 मीटर्स पाठोपाठ 1500 मीटर्स फ्री स्टाईलचेही सुवर्ण जिंकत आपली मक्तेदारी अधोरेखित केली. अमेरिकेने यंदा टोकियोत 11 सुवर्णपदके जिंकली. पण, ती रिओ व लंडनपेक्षा 5 ने कमी भरली आहेत.
ऑस्ट्रेलियाने जलतरणात सर्वाधिक 9 सुवर्णपदके जिंकली तर ब्रिटनला 4 सुवर्णपदकांवर समाधान मानावे लागले. टोकियोत 4 सुवर्ण जिंकणाऱया मॅकॉनने बटरफ्लाय लेगमध्ये मोलाचा वाटा उचलत मेडले रिलेचे सुवर्ण जिंकून दिले. कॅटे कॅम्पबेलने शेवटच्या लेगमध्ये लक्षवेधी योगदान दिल्यानंतर अमेरिकेला रौप्यपदक जिंकता आले.
मॅकॉनने यावेळी एकाच स्पर्धेत 7 ऑलिम्पिक पदके जिंकणाऱया मायकल फेल्प्स, मार्क स्पित्झ, मॅट बियॉन्डी या जलतरणपटूंशी बरोबरी साधली. रशियन जिम्नॅस्ट मारिया गोरोकोव्हास्का 1952 मध्ये अन्य क्रीडा प्रकारात असा पराक्रम करणारी एकमेव ऍथलिट आहे.
मॅकॉनची टोकियो ऑलिम्पिकमधील कमाई
इव्हेंट / पदक
महिला 100 मी. फ्री स्टाईल / सुवर्ण
महिला 4ƒ100 मी. फ्री स्टाईल रिले / सुवर्ण
महिला 4ƒ100 मी. मिडले रिले / सुवर्ण
महिला 50 मी. फ्री स्टाईल / सुवर्ण
मिश्र 4ƒ100 मी. मेडले रिले / कांस्य
महिला 100 मी. बटरफ्लाय / कांस्य
महिला 4ƒ200 मी. फ्री स्टाईल रिले / कांस्य