कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात झालेला मॅट घोटाळा बाहेर काढल्यानेच प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी विनयभंगाची खोटी तक्रार दिली आहे. वर्ग एकच्या अधिकारी असलेल्या या व्यक्तीने 19 महिन्यापुर्वी आपल्यासोबत चुकीचे वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मग ही तक्रार 19 महिन्यांनी देण्याचे कारण काय ? शिक्षणाधिकारी मॅट घोटाळ्यात अडचणीत आल्या आहेत. त्यामुळेच त्यांनी माझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार केली आहे. मात्र अशा तक्रारींना आपण घाबरत नाही. न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडूच .पण शिक्षण विभागात झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असे जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांनी सांगितले.
भोजे यांच्या विरोधात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. याबाबत बोलताना भोजे म्हणाले, सदरची तक्रार ही खोटी आहे. शिक्षण विभागातील मॅट घोटाळा उघड केल्यानचे त्यांनी ही तक्रार केली आहे. फिर्यादित याचा उल्लेखही करण्यात आला आहे. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी शिक्षण विभागावर 2 लाख 50 हजाराची जबाबदारी ठेवली आहे. आम्ही हा घोटाळा बाहेर आणल्यानेच त्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित झाली आहे. या द्वेषापोटी त्यांनी जाणीवपूर्वक माझ्याविरोधात तक्रार दिली आहे. या घोटाळ्यावर मी आवाज उठवू नये, यासाठीच त्यांनी तक्रार केल्याचे भोजे यांनी सांगितले.
तक्रारीमध्ये दिवाळी भेटीचा उल्लेख आला आहे. रात्रीच्यावेळी या दिवाळी भेट नव्हे तर पैसे द्यायला आल्या होत्या. त्यांना आपण परत पाठवले. त्यांच्या कारभाराचा सभागृहात पंचनामा होवू नये यासाठी त्यांनी वेळोवळे असे प्रयत्न केले. मात्र त्याला आपण दाद दिली नसल्यानेची त्यांनी खोटी तक्रार केली आहे. मात्र या तक्रारींना आपण घाबरत नाही. उलट भ्रष्टाचाराविरोधात आवाज आणखी बुलंद केला जाईल. या सर्व घटनेत सर्वपक्षीय सदस्य माझ्यासोबत असून अशा चुकीच्या गोष्टींना जिल्हा परिषद थारा देत नाही, हे या निमित्त दाखवून दिले आहे. न्यायालयात आम्ही निर्दोष सिध्द होवू, असा विश्वास भोजे यांनी व्यक्त केला
आज सर्वपक्षीय जि. प सदस्यांची बैठक
भाजपचे जि प सदस्य भोजे यांच्यावर प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच सोमवारी जिल्हापरिषदेत खळबळ उडाली.याबाबत सर्वपक्षीय सदस्यांची मंगळवारी दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे.