तुमच्यापैकी बऱयाच जणांना सुडोकू, शब्दकोडी सोडवायची सवय असते. यामुळे मेंदूला खाद्य मिळतं. मेंदू तल्लख बनतो. पण सगळेच जण शब्दकोडी, सुडोकू सोडवत नाहीत. तसं असेल तर अशा मंडळींना मेंदू तल्लख बनवण्यासाठी काही व्यायामही करता येतील. त्यादृष्टीने मेंदू तल्लख बनवणाऱया काही व्यायाम प्रकारांविषयी जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.
धावल्यामुळे शरीर तंदुरुस्त होतं. शिवाय मेंदूही तल्लख होतो. धावल्यामुळे मेंदूत नव्या पेशींची निर्मिती होते. यामुळे मेंदू नव्या गोष्टी लवकर आत्मसात करतो. शिवाय स्मरणशक्तीही सुधारते. धावल्यामुळे मेंदू ताण सुलभपणे हाताळतो. तसंच मेंदूची कार्यक्षमताही सुधारते.
मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी एअरोबिक्स करता येईल. आठवडय़ातली 150 मिनिटं सौम्य ते मध्यम स्वरुपाचा एअरोबिक्स व्यायाम केल्यामुळे मेंदूला खूप लाभ होतात.
सायकल चालवल्यामुळे मेंदूला होणाऱया रक्तपुरवठय़ात सुधारणा होते. यामुळे नव्या पेशींची निर्मिती होऊन मेंदूला चालना मिळते.
मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणेमुळे मेंदूला बरेच लाभ होतात. मेडिटेशन केल्यामुळे मन शांत होतं आणि एकाग्रता वाढते. स्मरणशक्ती सुधारणं आणि ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन करायला हवं.